राहुल यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसला किरेन रिजिजूंनी विचारले चार प्रश्न
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी १९६२ मधील भारत-चीन युद्ध, देशातील गरिबी, पूर्व
KIREN RIJIJU COUNTER RAHUL GANDHI CONGRESS FOUR Q


नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी १९६२ मधील भारत-चीन युद्ध, देशातील गरिबी, पूर्वीची आर्थिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा याबाबत काँग्रेसकडे चार प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.

किरेन रिजिजू यांनी शनिवारी समाजमाध्यम मंच एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी यांचा पंतप्रधानांना विरोध आता देशाविरोधातील वक्तव्यांपर्यंत पोहोचला आहे. रिजिजू यांनी काँग्रेसला १९६२ मधील अपमानाबद्दल माफी मागण्याची आणि त्यावेळच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत उत्तर देण्याची मागणी केली.

रिजिजू यांनी विचारले की, १९६२ मध्ये त्यांचे गाव चीनच्या ताब्यात गेले होते, त्या अपमानाबद्दल काँग्रेस माफी मागणार का? दुसरा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी विचारले की, काँग्रेसने भारताला गरीब देश म्हणून का ठेवले? तिसऱ्या प्रश्नात त्यांनी भारताला एकेकाळी सापांचे खेळ दाखवणाऱ्यांचा देश म्हणून का ओळखले जात होते, असा सवाल केला. चौथ्या प्रश्नात भारतीय अर्थव्यवस्थेला 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' असे संबोधून तिचा अपमान का करण्यात आला, असे विचारले.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना 'समझौतावादी' म्हटल्यानंतर रिजिजू यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. राहुल गांधी यांनी १९ नोव्हेंबर रोजी एक्सवर चीनमधील शेनझेन येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकत्र उपस्थित असलेला फोटो शेअर केला होता. त्यासोबत त्यांनी म्हटले होते की, जर काँग्रेस सत्तेत असती, तर भारताचे पंतप्रधान या टेबलावर (डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत) बसले असते.

उल्लेखनीय म्हणजे, हा फोटो १९ नोव्हेंबर रोजी शेनझेन येथील काइलिन व्हिला येथे झालेल्या तिन्ही नेत्यांच्या त्रिपक्षीय बैठकीतील होता. ही बैठक २०२६ च्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (एपेक) शिखर परिषदेदरम्यान झाली होती. या बैठकीत अण्वस्त्रांवरील नियंत्रण, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा तसेच युक्रेन आणि इराणमधील संघर्ष यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती. हे तिन्ही देश जगातील प्रमुख अण्वस्त्रधारी शक्तींमध्ये समाविष्ट असून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यही आहेत. भारत मात्र एपेकचा सदस्य नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande