नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांचा उद्यापासून पहिला भारत दौरा; केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद करणार स्वागत
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्या भारत दौऱ्यादरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताचे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद त्यांचे स्वागत करणार आहेत. पंतप्रधान शाह हे भारता
NEPAL PM BALENDRA SHAH VISIT INDIA JITIN PRASADA W


नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्या भारत दौऱ्यादरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताचे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद त्यांचे स्वागत करणार आहेत.

पंतप्रधान शाह हे भारताच्या राजकीय दौऱ्यासाठी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळ एअरलाईन्सच्या विमानाने दिल्लीसाठी रवाना होतील. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून शाह दोन दिवसीय राजकीय दौऱ्यावर भारतात येत आहेत. यावर्षी २६ मार्च रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अधिकृत परदेश दौरा असेल.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, दिल्ली येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान शाह यांची पहिली भेट भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी होईल. सायंकाळी ६ वाजता हॉटेल ताज येथे दोघांची भेट निश्चित करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पंतप्रधान शाह महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील.

यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सकाळी ११ वाजल्यापासून हैदराबाद हाऊस येथे प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा होईल. या चर्चेदरम्यान व्यापार, पारगमन, गुंतवणूक, ऊर्जा, हे संपर्क व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचा विकास यांसह विविध क्षेत्रांतील आर्थिक सहकार्य वाढविण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी ही माहिती दिली.

नेपाळच्या परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, या दौऱ्यादरम्यान शिक्षण, आरोग्य, कृषी, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन आणि मनुष्यबळ विकास यांसारख्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांशी संबंधित सामंजस्य करारांची (एमओयू) देवाणघेवाणही केली जाणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या प्राधान्याच्या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याचा आणखी विस्तार होईल.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारत हा नेपाळचा मोठा आणि महत्त्वाचा विकास भागीदार आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या नेतृत्वामध्ये विकास भागीदारी अधिक प्रभावी करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे.

परराष्ट्र सचिव म्हणाले, द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने उच्चस्तरीय दौरे अपरिहार्य आहेत. दोन्ही देशांमध्ये इतिहास, सभ्यता, संस्कृती आणि जनतेच्या पातळीवर अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. प्रस्तावित दौरा नेपाळ आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंधांना नवी उंची देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा आहे.

द्विपक्षीय चर्चेनंतर दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी दोन्ही देशांचे पंतप्रधान हैदराबाद हाऊस येथेच काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होताना उपस्थित राहणार आहेत. तसेच जनकपूर-अयोध्या विशेष रेल्वेसेवेचे उद्घाटन करण्यासह अनेक अन्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात येणार आहे.

कार्यक्रमानंतर पंतप्रधान शाह हे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती भवन येथे पोहोचतील. आपल्या दोन दिवसीय राजकीय दौऱ्याच्या अखेरीस पंतप्रधान शाह त्याच दिवशी दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी नेपाळ एअरलाईन्सच्या विमानाने मायदेशी परततील.

पंतप्रधान शाह यांच्या नेतृत्वाखाली भारतात येणाऱ्या अधिकृत प्रतिनिधीमंडळात ३४ सदस्यांचा समावेश असेल. पंतप्रधानांसोबत अर्थमंत्री डॉ. स्वर्णिम वाग्ले, परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल, पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार, राजकीय सल्लागार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी भारतात येणार आहेत.

याशिवाय ५२ सदस्यीय व्यापारी प्रतिनिधीमंडळही भारत दौऱ्यावर असेल. हे प्रतिनिधीमंडळ नेपाळ-भारत व्यावसायिक गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भारताची सीआयआय आणि नेपाळ उद्योग वाणिज्य महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल ताज येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल आणि अर्थमंत्री स्वर्णिम वाग्ले संबोधित करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande