
लातूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। विमानतळ रोड परिसरातील गोल्डन लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून, तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण ४१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोल्डन लॉजमध्ये अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पथकाने एमआयडीसी पोलिसांसह लॉजवर छापा टाकला. यावेळी तिथे देहव्यापार सुरू असल्याचे आढळून आले. पोलीस तपासात आरोपींनी आपसात संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना गोल्डन लॉज येथे बोलावून घेतले होते. त्यांना पैशांचे आमिष दाखवून परिसरातील तसेच शहरातील पुरुष ग्राहकांना लॉजवर बोलावून महिलांकडून देहव्यापार करवून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर आरोपी स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कारवाईदरम्यान पश्चिम बंगालमधील एका महिलेसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
या प्रकरणी संगीता ऊर्फ स्वाती विभीषण बोंदर (वय ४० वर्षे, रा. स्वराज्य नगर, बार्शी रोड, लातूर), सुदर्शन विभीषण बोंदर (वय २५ वर्षे, रा. स्वराज्य नगर, बार्शी रोड, लातूर) आणि दत्ता लिंबाजी पवार (वय ४७ वर्षे, रा. विवेकानंद चौक, लातूर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून देहव्यापारातून मिळालेली ५०० रुपये दराच्या तीन नोटा, एकूण १,५०० रुपये, कंडोमची पाकिटे, विवो कंपनीचे तीन मोबाईल व मोटोरोलाचा एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोबाईल फोनची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असून इतर साहित्य व रोख रकमेसह एकूण ४१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पोलीस ठाणे एमआयडीसी, लातूर हे करीत आहेत. त्यांना पोलीस अंमलदार दयानंद आरदवाड हे सहकार्य करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक समाधान चवरे, सपोनी अजिनाथ पाटील, पोलीस अंमलदार सदानंद योगी, महिला पोलीस अंमलदार सुधामती वंगे, लता गिरी, सचिन मुंडे यांनी केली आहे. महिला व मानवी तस्करीसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवून कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis