विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी करावा : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजकल्याण आणि राष्ट्र उभारणीसाठी करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. शिक्षण हे केवळ पदवी किंवा रोजगार मिळविण
fgdf


पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजकल्याण आणि राष्ट्र उभारणीसाठी करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. शिक्षण हे केवळ पदवी किंवा रोजगार मिळविण्याचे साधन नसून व्यक्तीचे चारित्र्य घडविणारे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या २३ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आणि वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर आदी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती म्हणाले, की व्यावसायिक यश जितके महत्त्वाचे आहे, तितकेच चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांनाही महत्त्व आहे. आयुष्यात कितीही मोठे यश मिळाले तरी आपल्या मूल्यांशी तडजोड करू नये. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासावी, आव्हानांना धैर्याने सामोरे जावे आणि समाजातील गरजू व्यक्तींना मदत करावी. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करण्यातच खरे यश आहे.

२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे. भारतातील मोठी युवा लोकसंख्या हे देशाचे सामर्थ्य असून, विद्यार्थ्यांनी जगात कुठेही गेले तरी भारतीय संस्कृती आणि मूल्यांचा अभिमान बाळगावा. आपल्या कार्यातून भारताची प्रतिमा उंचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

सिंबायोसिसच्या कार्याचे कौतुक करताना राधाकृष्णन म्हणाले, की ही संस्था केवळ शैक्षणिक केंद्र नसून जागतिक समज, शैक्षणिक उत्कृष्टता आणि सर्वसमावेशक शिक्षणाचा संगम आहे. विविध देशांतील विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळत आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' हा भारतीय विचार संस्थेच्या कार्यातून प्रत्यक्षात उतरतो. संस्थेतील ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी १९ हजारांहून अधिक महिला असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत मानवी मूल्ये जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन आणि आधुनिक विज्ञानामुळे जग वेगाने बदलत आहे. या बदलांचा स्वीकार करताना नैतिकता, करुणा आणि सामाजिक जबाबदारी यांचा विसर पडता कामा नये. भविष्यात ज्ञानासोबत विवेक, नवकल्पनांसोबत करुणा आणि महत्त्वाकांक्षेसोबत प्रामाणिकपणा जपणाऱ्यांचे महत्त्व वाढणार आहे.

विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यापीठांनी उत्कृष्टता, संशोधन आणि नवोपक्रमाची केंद्रे बनले पाहिजे. विद्यार्थ्यांनी पदवीला शिक्षणाचा शेवट न मानता नव्या ज्ञानप्रवासाची सुरुवात समजावी, असेही राज्यपाल म्हणाले. सिंबायोसिसच्या माध्यमातून ३५ गावांमध्ये आरोग्यसेवा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य तसेच भारतीय सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या 'ईशान्य भवन'चेही त्यांनी कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande