
तिराना, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।अल्बानियाची राजधानी तिराना येथे शनिवारी (२१ नोव्हेंबर २०२६) सरकारविरोधात विद्यार्थी आणि नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक शिक्षण मंत्रालयाबाहेर जमले होते. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे शिक्षण मंत्रालयाबाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली. सुमारे दोन तास गोंधळ घातल्यानंतर आंदोलकांचा जमाव पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला. तेथे त्यांनी पंतप्रधान एडी रामा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
याशिवाय, शहरातील इतर भागांतूनही आंदोलकांनी मोर्चा काढत सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि आंदोलकांवर लक्ष ठेवले. आंदोलकांनी शहरातील अनेक ठिकाणी हिंसक प्रकार घडवले. एका ठिकाणी कचरापेटी पेटवून देण्यात आली. त्यानंतर काही आंदोलक अल्बानियाचे राष्ट्रीय नायक गेर्गज कास्त्रिओती स्कँडरबेग यांच्या स्मारकावर चढले आणि तेथे अल्बानियाचा राष्ट्रध्वज फडकवला.
सुमारे तीन तास मोर्चा काढल्यानंतर आंदोलक पंतप्रधान कार्यालयाजवळ पोहोचले आणि तेथेही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. काही आंदोलकांनी पंतप्रधान एडी रामा आणि इतर राजकीय नेत्यांना अटक करण्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही आंदोलने प्रामुख्याने देशातील शिक्षण व्यवस्थेतील समस्या आणि तरुणांसाठी संधींच्या अभावावर केंद्रित आहेत. मात्र, आता या आंदोलनाचे स्वरूप केवळ शिक्षणाशी संबंधित मागण्यांपुरते मर्यादित राहिलेले नसून, व्यापक सरकारविरोधी आंदोलनात रूपांतर झाले आहे.
आंदोलकांनी सरकारवर भ्रष्टाचार आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिक आणि तरुणांना पुरेशा आर्थिक संधी उपलब्ध होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विरोधक आणि आंदोलकांनी राजकीय उत्तरदायित्व, निवडणूक सुधारणांची अंमलबजावणी आणि अंतरिम सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode