
जकार्ता, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।इंडोनेशियातील बँटन प्रांतात शनिवारी एका कँडी कारखान्याला आग लागली. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून, ३६ कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथक बेपत्ता असलेल्या ३६ कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. आग लागून १२ तासांहून अधिक काळ उलटूनही अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यास आणि कूलिंग ऑपरेशनमध्ये व्यस्त आहेत.
बचाव पथकाने नुकसानग्रस्त इमारतीत कर्मचाऱ्यांचा शोध सुरू ठेवला आहे. आतापर्यंत १५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी ४ जण जखमी झाले आहेत. जकार्ताजवळील सेरांग जिल्ह्यात असलेल्या 'पीटी फोनुसा आगुंग मुलिया' या कारखान्याला आग लागली. या कारखान्यात 'मिल्किटा' ब्रँडच्या दुधापासून बनवलेल्या कँडी आणि स्नॅक्सचे उत्पादन केले जाते.
बँटन शोध आणि बचाव संस्थेचे अधिकारी रिजकी द्वियांतो यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी अद्याप आग धुमसत आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे आणि कूलिंगचे काम करत आहेत.द्वियांतो यांनी सांगितले की, सेरांग जिल्हा आणि बँटन प्रांतातील अग्निशमन दलाचे जवान कारखान्याच्या विविध भागांमध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. बचाव पथक कारखान्याच्या वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. या मोहिमेत स्थानिक अग्निशमन दलासोबत इंडोनेशियन रेड क्रॉसही मदत करत आहे.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागली तेव्हा सर्व ३६ बेपत्ता कर्मचारी कारखान्यातच होते का, याबाबतही अधिकाऱ्यांनी अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.
मात्र, दुर्घटनेतून बचावलेल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारखान्याच्या तिसऱ्या मजल्यावरील कूलिंग युनिटजवळ आग लागली होती.घटनेचे व्हिडिओही समोर आले असून, त्यात तीन मजली कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे आणि आकाशात काळ्या धुराचे दाट लोट पसरल्याचे दिसत आहे. आगीनंतरच्या छायाचित्रांमध्ये वाकलेले धातू, जळालेली छप्पर आणि इमारतीच्या नुकसानग्रस्त मजल्यांवर विखुरलेला मलबा दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode