पुतिन यांच्या आक्रमकतेमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका, ब्रिटनच्या संरक्षण गुप्तचर प्रमुखांचा इशारा
लंडन, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। ब्रिटनचे संरक्षण गुप्तचर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मॅथ्यू जोन्स यांनी इशारा दिला आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची पाश्चिमात्य देशांविषयीची आक्रमक भूमिका मोठी चूक ठरू शकते. या चुकीचे अत्यंत धोकादा
पुतिन यांच्या आक्रमकतेमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका? ब्रिटनच्या संरक्षण गुप्तचर प्रमुखांचा इशारा


लंडन, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। ब्रिटनचे संरक्षण गुप्तचर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मॅथ्यू जोन्स यांनी इशारा दिला आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची पाश्चिमात्य देशांविषयीची आक्रमक भूमिका मोठी चूक ठरू शकते. या चुकीचे अत्यंत धोकादायक परिणाम होऊ शकतात आणि त्यातून तिसऱ्या महायुद्धालाही तोंड फुटण्याची शक्यता आहे. जोन्स यांनी सांगितले की, रशियाला जाणीवपूर्वक नाटोशी युद्ध करायचे नसले, तरी रशियाच्या वाढत्या ‘बेजबाबदार कृतींमुळे’ छोट्या घटनांचे मोठ्या युद्धात रूपांतर होण्याचा धोका वाढला आहे.

‘केंब्रिज इंटेलिजन्स सेमिनार’मध्ये भाषण देताना जोन्स म्हणाले, “मोठ्या गैरसमजामुळे किंवा चुकीच्या आकलनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका ही माझी सर्वात मोठी चिंता आहे.” ते पुढे म्हणाले, “पुतिन दबावाखाली आहेत आणि आम्हाला आव्हान देण्याच्या प्रयत्नात त्यांची भूमिका अधिक कठोर आणि आक्रमक होत चालली आहे. अलीकडच्या काळात रशियाच्या बेजबाबदार वर्तनाची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. परिस्थिती थोडी जरी वेगळी असती, तरी त्याचे परिणाम अत्यंत गंभीर झाले असते.”

ब्रिटनच्या संरक्षण गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचे हे विधान नाटो सदस्य देशांच्या प्रदेशांमध्ये आणि त्यांच्या आसपास रशियाच्या वाढत्या हालचालींबाबत चिंता वाढत असताना आले आहे. पोलंडमध्ये रशियन क्षेपणास्त्रे आणि संशयास्पद ड्रोन कोसळण्याच्या घटनांपासून ते डेन्मार्कमध्ये एका अमेरिकन-युक्रेनियन नागरिकाच्या हत्येचा कथित कट उघडकीस येण्यापर्यंतच्या घटनांचा यात समावेश आहे. या घटनांचे धागेदोरे रशियन गुप्तचर यंत्रणेशी जोडले जात असल्याचा दावा केला जात आहे.

जोन्स यांनी रशियाशी संबंधित इतर अनेक घटनांचाही उल्लेख केला.यामध्ये जर्मनीतील लाइपझिग शहराच्या विमानतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचाही समावेश आहे. हा प्रकार त्यांनी ‘अलीकडच्या काळातील सर्वात गंभीर आणि निषेधार्ह घटना’ असल्याचे म्हटले. तसेच नाटो सदस्य देश रोमानियाच्या काळ्या समुद्रातील सागरी क्षेत्रात व्यापारी जहाजे बुडाल्याच्या घटनांकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ब्रिटनला रशियाशी संघर्ष किंवा युद्ध नको आहे, मात्र देशाच्या सुरक्षेला निर्माण होणाऱ्या कोणत्याही धोक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जोन्स म्हणाले, “ब्रिटनची भूमिका स्पष्ट करू इच्छितो. आम्हाला रशियाशी कोणताही संघर्ष किंवा टकराव नको आहे. मात्र, आमच्या आणि आमच्या मित्रराष्ट्रांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास आम्ही पूर्ण ताकदीने स्वतःचे संरक्षण करू.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande