
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह रविवारी पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यावर नवी दिल्ली येथे दाखल झाले. दोन दिवसांच्या या राजकीय दौऱ्यात ऊर्जा, पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्था आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर विशेष चर्चा होणार आहे. दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी त्यांचे स्वागत केले.
बालेन शाह यांच्यासोबत ३४ सदस्यांचे अधिकृत प्रतिनिधिमंडळ तसेच स्वतंत्र व्यापारी प्रतिनिधीमंडळही भारतात आले आहे. नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांच्या माहितीनुसार, बालेन शाह सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेते ऊर्जा क्षेत्रातील अनेक प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन करतील. तसेच परस्पर सहकार्याशी संबंधित विविध करारांची देवाणघेवाणही केली जाणार आहे.याशिवाय, बालेन शाह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. ते राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करतील. तसेच नेपाळ-भारत व्यापार मंचमध्येही सहभागी होणार आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दौऱ्यात विकास सहकार्य, ऊर्जा, रेल्वे-रस्ते आणि हवाई संपर्क व्यवस्था, व्यापार व पर्यटन यांसह कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि क्रीडा यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्यावर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, बालेन शाह यांच्या या दौऱ्यात सहकार्य वाढवण्यासोबतच दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मतभेदांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भागांवरील सीमावाद, तसेच भारतीय सैन्यात नेपाळी गोरखांची भरती यासंबंधीचे मतभेद चर्चेत येऊ शकतात.
नेपाळचे माजी पंतप्रधानांचे सल्लागार राजन भट्टराई यांनी सुमारे आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘एमिनेंट पर्सन्स ग्रुप’ (ईपीजी) अहवालाबाबतही चर्चा पुढे सरकण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याशिवाय, नव्या पेट्रोलियम आणि गॅस पाइपलाइन उभारणे तसेच नैसर्गिक आपत्तीनंतर पुनर्बांधणीसाठी भारताकडून मिळणाऱ्या मदतीवरही विशेष भर दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode