तब्बल १०,७६७ किमीचा प्रवास करून दुर्मिळ 'भारतीय गिधाड' लातुरात दाखल
लातूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। निसर्गाचा ''स्वच्छतादूत'' मानल्या जाणाऱ्या आणि अतिगंभीर संकटग्रस्त (Critically Endangered) प्रजातीमध्ये समाविष्ट असलेल्या दुर्मिळ भारतीय गिधाडाचे (Indian Vulture) लातूर जिल्ह्यात प्रथमच दर्शन झाले आहे. ''बॉम्बे नॅच
गिधाड


लातूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। निसर्गाचा 'स्वच्छतादूत' मानल्या जाणाऱ्या आणि अतिगंभीर संकटग्रस्त (Critically Endangered) प्रजातीमध्ये समाविष्ट असलेल्या दुर्मिळ भारतीय गिधाडाचे (Indian Vulture) लातूर जिल्ह्यात प्रथमच दर्शन झाले आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (BNHS) मार्फत संवर्धन करून मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून निसर्गमुक्त करण्यात आलेल्या या सात वर्षीय मादी गिधाडाने तब्बल १० हजार ७६७ किलोमीटरचा प्रवास करत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात मुक्काम केला. लातूर जिल्ह्यातील या दुर्मिळ पक्ष्याच्या दर्शनाची ही पहिलीच अधिकृत नोंद ठरली आहे.

पहाटेची विशेष मोहीम आणि निरीक्षण:

अभिजित रसाळ यांनी या गिधाडाच्या आगमनाची माहिती लातूरचे वन्यजीवप्रेमी धनंजय गुट्टे यांना दिली होती. लातूर सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक (DFO) व वन्यजीव छायाचित्रकार श्री. अमितराज जाधव, वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार धनंजय गुट्टे आणि डॉ. दत्ता आंबेकर यांनी औसा परिसरात विशेष निरीक्षण मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान हे गिधाड एका झाडावर सुदृढ अवस्थेत बसलेले आढळले. त्याच्या डाव्या पायात पिवळ्या रिंगवर F14 आणि उजव्या पायात निळ्या रिंगवर M99 असा टॅग असून, त्याच्या पाठीवर सॅटेलाईट ट्रॅकिंग डिव्हाइस (Tracking Device) बसवण्यात आले आहे. अभ्यासकांनी या दुर्मिळ क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण केले.

१० हजार किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास:

हरियाणातील पिंजोर येथील BNHS च्या प्रजनन केंद्रात या गिधाडाचा जन्म झाला असून, २८ मे २०२६ रोजी मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सोमठाणा वनपरिक्षेत्रातून इतर १५ गिधाडांसह या मादी गिधाडाला निसर्गमुक्त करण्यात आले होते.

तिने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांत मिळून १०,७६७ किमीचा प्रवास पूर्ण केला.

मध्य प्रदेशातील हलाली धरण परिसरात ती रानटी गिधाडांच्या समूहात मिसळून स्वतःहून खाद्य शोधताना आढळली होती, जे या संवर्धन मोहिमेचे मोठे यश मानले जात आहे.

कर्नाटकातील विजयपुरा येथून प्रवास करत ती औसा तालुक्यात आली होती आणि आता मुरबाड (जि. ठाणे) येथे पोहोचल्याची माहिती BNHS चे अभिजित दास यांनी दिली.

संवर्धनाची गरज:

Gyps indicus हे शास्त्रीय नाव असलेले भारतीय गिधाड मृत जनावरांचे मांस खाऊन पर्यावरणातील रोगप्रसार रोखण्याचे महत्त्वाचे कार्य करते. मात्र, पशुवैद्यकीय उपचारांतील 'डायक्लोफेनाक' (Diclofenac) या औषधामुळे यांची संख्या झपाट्याने घटली आहे. रामायणातील जटायूचे वंशज असलेल्या या पक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी लातूरचे हे निरीक्षण वन्यजीव अभ्यासकांसाठी अत्यंत आश्वासक मानले जात आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande