
नवी दिल्ली , 22 नोव्हेंबर (हिं.स.)।लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले. भाजप-आरएसएसला ‘असभ्य, लोभी, जातिवादी आणि पुरुषप्रधान मानसिकतेचे’ ठरवत, त्यांना भारताच्या आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरांची कोणतीही समज नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत राहुल गांधी यांनी भाजप आणि संघावर टीका केली. त्यांनी एलिफंटा लेण्यांमधील ‘अर्धनारीश्वर’ मूर्तीचे छायाचित्रही शेअर केले. या मूर्तीमध्ये भगवान शिव आणि देवी पार्वती एकाच रूपात दर्शविले आहेत. सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी आई-वडिलांच्या (सोनिया आणि राजीव गांधी) नात्याबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर राहुल गांधी यांची ही पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.यापूर्वीही त्यांनी १७ नोव्हेंबर रोजी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये १२व्या शतकातील एका मंदिरातील मूर्तीचे छायाचित्र होते. या मूर्तीमध्ये देवी पार्वती भगवान शिव यांच्या मांडीवर बसलेली दिसत होती. त्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले होते की, भीती, राग आणि द्वेषाने भाजप व आरएसएस समर्थकांच्या मनात असे जाळे विणले आहे, जे त्यांना प्रेम व्यक्त करण्यापासून रोखते.
पुढे त्यांनी लिहिले होते, ‘एक खरा हिंदू म्हणून, त्यांना या जाळ्यातून मुक्त करणे हे माझे कर्तव्य आहे, जेणेकरून त्यांनाही आपल्या आयुष्यात प्रेम आणि आपलेपणाच्या अद्भुत सौंदर्याचा व आनंदाचा अनुभव घेता येईल. सत्यम शिवम सुंदरम.’
राहुल गांधी यांच्या या सोशल मीडिया पोस्ट सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी गेल्या सोमवारी त्यांनी आपल्या आई-वडिलांबद्दल केलेल्या विधानावरून निर्माण झालेल्या वादानंतर आल्या. आई-वडिलांमधील जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण सांगताना राहुल गांधी म्हणाले होते की, जेवताना अनेकदा ‘पप्पा बसलेले असायचे आणि त्यांच्या मांडीवर मम्मी बसलेली असायची.’
राहुल गांधी यांनी सांगितले की, त्यांना सुरुवातीला हे सामान्य वाटत होते. मात्र, त्यांच्या मित्रांच्या आई-वडिलांना अशा प्रकारे प्रेम व्यक्त करताना पाहिले नाही, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या या विधानांवरून भाजप नेते आणि समर्थकांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका केली आणि ट्रोल केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode