नीट यूजी पेपरफुटीत शिवराज मोटेगावकरांसह १४ जणांवर दोषारोप निश्चित
आता न्यायालयात थेट खटला चालणार ! लातूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। देशभरातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला हादरा देणाऱ्या नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात आता कायदेशीर कारवाईला निर्णायक वेग आला आहे. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालय या विशेष जलदगती न्
शिवराज मोटेगावकर


- आता न्यायालयात थेट खटला चालणार !

लातूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।

देशभरातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला हादरा देणाऱ्या नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात आता कायदेशीर कारवाईला निर्णायक वेग आला आहे. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालय या विशेष जलदगती न्यायालयाने या प्रकरणातील सर्व १४ आरोपींवर रीतसर दोषारोप निश्चित केले आहेत. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी या संदर्भातील आदेश दिले होते. त्यानुसार न्यायालयीन कोठडीत असलेल्या सर्व आरोपींना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सर्वच आरोपींनी आपण निर्दोष असल्याचा दावा करत थेट खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. हिंदूस्तान टाइम्सने या घडामोडीचे वृत्त दिले आहे.

सर्व आरोपींवर गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, फौजदारी विश्वासघात आणि पुरावे नष्ट करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४ मधील तरतुदींचाही त्यात समावेश आहे. ३ मे २०२६ रोजी देशभरात झालेल्या या परीक्षेला सुमारे २२ लाख विद्यार्थी बसले होते. मात्र, प्रश्नपत्रिका फुटल्याच्या गंभीर आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) हिने १२ मे रोजी ही परीक्षा रद्द केली आणि २१ जून रोजी फेरपरीक्षा घेतली होती.

या पेपरफुटीचे तीव्र पडसाद देशभरात उमटले होते. या प्रकरणावरून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने मोठे आंदोलन केले होते, तर २० जुलै रोजी हजारो विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. या प्रकरणामुळे तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनुसार परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र अशा प्रत्येकी १८० प्रश्नांचे चार मास्टर संच तयार केले जातात व त्यातील दोन संच छापून केंद्रांवर वितरीत केले जातात. २०२६ च्या परीक्षेसाठी कैलास आणि शिवालिक अशी प्रशासकीय कोडनावे असलेले संच वापरले होते. लातूरच्या आरसीसी क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमधील जप्त दस्तऐवजाची तुलना केली असता, शिवालिक संचातील रसायनशास्त्राचे सर्व ४५ प्रश्न तंतोतंत जुळले. तसेच कैलास संचातील ४५ पैकी ४३, दुसऱ्या मास्टर संचातील ४० आणि तिसऱ्या संचातील १ प्रश्न लीक झालेल्या माहितीशी जुळला आहे.

या प्रकरणात सीबीआयने दोन स्वतंत्र आरोपपत्रे दाखल केली आहेत. २८ जुलै रोजीच्या पहिल्या आरोपपत्रात १३ जणांची नावे होती. यात एनटीएशी संलग्न विषयतज्ज्ञ मनीषा गुरुनाथ मांढरे (जीवशास्त्र), प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी (रसायनशास्त्र) व मनीषा संजय हवालदार (भौतिकशास्त्र) यांच्यासह खासगी शिकवणी वर्गांशी संबंधित दोन व्यक्ती व दलालांचा समावेश आहे. इतर आरोपींमध्ये तेजस शहा, शिवराज मोटेगावकर, डॉ. मनोज शिरुरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मांगीलाल बिवाल उर्फ मांगीलाल खातीक, दिनेश बिवाल आणि विकास बिवाल यांचा समावेश आहे. पुढे १४ ऑक्टोबर रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल करत महाराष्ट्रातील चहाविक्रेता शेषराव बजरंग सूर्यवंशी ऊर्फ राज सूर्यवंशी यालाही आरोपी करण्यात आले.

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित या संवेदनशील प्रकरणात दोषारोप निश्चित झाल्याने आता प्रत्यक्ष न्यायालयीन सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande