माथेरानसारखे पर्यटनवैभव जवळ, तरी नेरळ अस्वच्छतेच्या विळख्यात
रायगड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। माथेरानसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या प्रवेशद्वारावर वसलेल्या नेरळ गावात सध्या कचऱ्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. गावातील मुख्य बाजारपेठेसह विविध सार्वजनिक ठिकाणी रविवारी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने अस्वच्
Neral in the grip of unhygienic conditions


Neral in the grip of unhygienic conditions


रायगड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। माथेरानसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या प्रवेशद्वारावर वसलेल्या नेरळ गावात सध्या कचऱ्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. गावातील मुख्य बाजारपेठेसह विविध सार्वजनिक ठिकाणी रविवारी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने अस्वच्छतेचे चित्र समोर आले. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या नेरळमध्ये अशी परिस्थिती निर्माण होत असताना नवीन प्रशासक आणि ग्रामसेवक नेमके करतात तरी काय, असा संतप्त सवाल उपस्थित करत संतोष भोईर यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

नेरळ हे कर्जत तालुक्यातील वेगाने विकसित होणारे गाव असून माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांची मोठी वर्दळ येथे असते. त्यामुळे गावाच्या स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. मात्र, मुख्य बाजारपेठेत आणि रस्त्यांच्या आसपास कचऱ्याचे ढिगारे दिसत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा साचल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

गावातील कचरा नियमित उचलणे, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करणे आणि कचरा व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा राबविणे ही ग्रामपंचायतीची महत्त्वाची जबाबदारी आहे. असे असताना कचऱ्याचे ढिगारे साचतातच कसे? नवीन प्रशासक आणि ग्रामसेवक यांचे या समस्येकडे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न संतोष भोईर यांनी उपस्थित केला आहे.

माथेरानसारखे पर्यटनवैभव जवळ असलेल्या नेरळला स्वच्छ आणि सुंदर गाव म्हणून विकसित करण्याची गरज आहे. मात्र, मूलभूत स्वच्छतेच्या प्रश्नावरच प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामपंचायतीने तातडीने कचरा हटवून नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी, तसेच बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी ठोस नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. नेरळच्या कचरा समस्येवर प्रशासन आता तरी ठोस पावले उचलणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande