
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता गेल्या सात दिवसांपासून खराब श्रेणीत कायम असून, आगामी आठवड्यात प्रदूषणाची पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील सहा दिवसांत दिल्लीतील हवा अतिखराब श्रेणीत पोहोचू शकते, असा इशारा वायू गुणवत्ता पूर्वसूचना प्रणालीने दिला आहे. वाहनांमधून होणारे उत्सर्जन हे दिल्लीतील प्रदूषणाचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. त्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
शनिवारी दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २६५ नोंदवण्यात आला. ही पातळी खराब श्रेणीत येते. गेल्या तीन दिवसांत हवेच्या गुणवत्तेत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. १९ नोव्हेंबर रोजी २८० असलेला एक्यूआय २० नोव्हेंबरला २७० वर आला, तर शनिवारी तो आणखी घसरून २६५ वर पोहोचला. मात्र, ही सुधारणा तात्पुरती ठरण्याची शक्यता असून, आगामी दिवसांत प्रदूषण पुन्हा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दिल्लीतील ५६ वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रांपैकी ३२ केंद्रांवर हवेची गुणवत्ता खराब, तर १६ केंद्रांवर अतिखराब श्रेणीत नोंदवण्यात आली. सात केंद्रांवरील हवा मध्यम श्रेणीत होती, तर एका केंद्रावर समाधानकारक गुणवत्ता आढळली. दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात सर्वाधिक ३६२ एक्यूआय नोंदवण्यात आला. याउलट दिल्ली कॅन्टोन्मेंट परिसरात हवेची गुणवत्ता तुलनेने चांगली असून, तेथे एक्यूआय केवळ ८० नोंदवण्यात आला.
प्रदूषणाच्या कारणांचा विचार करता, दिल्लीतील पीएम २.५ प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सर्वाधिक ३३.१ टक्के वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सेंद्रिय सूक्ष्मकणांचा १६.५ टक्के, जैविक इंधन जाळण्याचा १३.९ टक्के आणि कचरा जाळण्याचा ९.५ टक्के वाटा आहे. गवत, लाकूड आणि शेणाच्या गोवऱ्या जाळल्यामुळेही प्रदूषणात भर पडत आहे. वायू गुणवत्ता पूर्वसूचना प्रणालीच्या अंदाजानुसार, रविवारीही दिल्लीतील हवा खराब श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरच्या सहा दिवसांत हवेची गुणवत्ता अतिखराब श्रेणीत पोहोचू शकते. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
तज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, बाहेर जाताना मास्कचा वापर करावा आणि प्रदूषणाच्या थेट संपर्कात येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, शनिवारी दिल्लीचे कमाल तापमान २७.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सामान्यपेक्षा ०.२ अंशांनी कमी होते. सफदरजंग येथे किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमानही सामान्यपेक्षा ०.१ अंशांनी कमी होते. तापमानात फारसा बदल नसला, तरी वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule