राजस्थानमध्ये भीषण अपघात; महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू
जयपूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ शनिवारी मध्यरात्रीनंतर सुमारे एक वाजण्याच्या सुमारास भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. ही घ
KOTA UDAIPUR HIGHWAY ACCIDENT


जयपूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ शनिवारी मध्यरात्रीनंतर सुमारे एक वाजण्याच्या सुमारास भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. ही घटना नांता पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शहर पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी बचावकार्यावर लक्ष ठेवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझर गाडीत महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील १६ सदस्य प्रवास करत होते. हे कुटुंब धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्रातून रवाना झाले होते. भाविकांनी सर्वप्रथम मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे, त्यानंतर राजस्थानमधील पुष्कर आणि खाटूश्यामजी येथे दर्शन घेतले. शनिवारी रात्री सर्वजण आपल्या घरी परतत होते.

या अपघातात क्रूझर गाडीतील आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या माधवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आशुतोष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना रुग्णालयात आणण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या मनीषा यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे.

मृतांची ओळख उषा बाई, सुशीला (५५), कैलाश (४५), सांवी, सज्जन, अनीता, बाबूलाल (६०), जान्हवी (१३) आणि माधवी अशी झाली आहे. एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमींमध्ये जगदीश (१०), मयुरी पवार (२०), मनीषा पवार (४५), शरद पवार (४६), गणेश पवार (३०), सृजेत (३) आणि ट्रकचालक हारून (४३) यांचा समावेश आहे. या सर्वांवर न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातग्रस्त क्रूझरच्या मागे दुसऱ्या वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रदीप यांनी सांगितले की, कुटुंबातील सर्व ३६ सदस्य तीन वाहनांमधून धार्मिक यात्रेसाठी निघाले होते. खाटूश्यामजी येथे दर्शन घेतल्यानंतर शनिवारी रात्री ते महाराष्ट्राकडे परतण्यासाठी रवाना झाले. प्रदीप यांच्या म्हणण्यानुसार, प्रवासादरम्यान सर्व वाहने एकमेकांच्या जवळून जात होती. अचानक पुढे चालणारी क्रूझर गाडी अपघातग्रस्त झाली.

जखमी ट्रकचालक हारून (४३) हा मध्य प्रदेशातील खंडवा येथील रहिवासी आहे. त्याने सांगितले की, ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याला रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवावा लागला होता. तो ट्रकपासून काही अंतरावर उभा होता. त्याचवेळी मागून वेगाने आलेल्या क्रूझर गाडीने प्रथम त्याला धडक दिली आणि त्यानंतर ट्रकच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तो सुमारे २० फूट दूर फेकला गेला आणि बेशुद्ध झाला. हारूनच्या म्हणण्यानुसार, सुमारे दहा मिनिटांनंतर शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलीस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि गुडघ्यांना दुखापत झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande