दक्षिण नायजेरियात नाव उलटून भीषण दुर्घटना; २४ जणांचा मृत्यू
अबुजा, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।दक्षिण नायजेरियात एका अंत्यविधीसाठी लोकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने २४ जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने पाण्यातून मृतदेह बाहेर काढले आहेत. या दुर्घटनेतील सर्वजण अंत्यसंस्कारासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे.
दक्षिण नायजेरियात नाव उलटून भीषण दुर्घटना; २४ जणांचा मृत्यू


अबुजा, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।दक्षिण नायजेरियात एका अंत्यविधीसाठी लोकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने २४ जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने पाण्यातून मृतदेह बाहेर काढले आहेत. या दुर्घटनेतील सर्वजण अंत्यसंस्कारासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्था (नेमा)चे प्रवक्ते मंजो एजेकिएल यांनी सांगितले की, आतापर्यंत घटनास्थळावरून २४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, शोध आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेनंतर बायलसा राज्य सरकारने नाव चालक आणि प्रवाशांना भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.बायलसा राज्याचे माहिती आयुक्त एबियुवो कोकू-ओबियाई यांनी शनिवारी निवेदनात म्हटले की, नावेत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे, अतिवेगाने नाव चालवणे, निष्काळजीपणा आणि लाइफ जॅकेटशिवाय प्रवास करणे थांबवले पाहिजे. कोणत्याही प्रवासासाठी एखाद्याचा जीव जाणे योग्य नाही.

दरम्यान, नायजेरियचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मृतांना अशा परिस्थितीत जीव गमवावा लागणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले की, या दुर्घटनेत ज्यांनी जीव गमावला, ते अशा प्रकारे मृत्यू पावण्यास पात्र नव्हते.

नायजेरियातील नद्या आणि जलमार्गांवर नाव दुर्घटना वारंवार घडतात. नावेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, देखभालीचा अभाव आणि सुरक्षा नियमांचे पालन न करणे ही यामागील प्रमुख कारणे आहेत. ही ताजी दुर्घटना नायजेरियातील जीवघेण्या नाव दुर्घटनांच्या मालिकेतील आणखी एक घटना आहे. ऑगस्टमध्ये देशाच्या वायव्य भागातील सोकोतो राज्यात नाव बुडाल्याने किमान ५१ जणांचा मृत्यू झाला होता. तर जानेवारीमध्ये जिगावा येथून योबे राज्याकडे जाणारी नाव उलटल्याने किमान २६ जण बुडाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande