
रायगड, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मानसिक आणि शारीरिक छळात झाल्याने एका तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या प्रियकराविरुद्ध नागोठणे पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. जून २०२६ पासून १७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत दोघेही खारढोंबी, पो. गडब, ता. पेण येथे भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. या काळात त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. आरोपी तरुणीला शिवीगाळ करून मारहाण करीत असे. तसेच, तिला औषध घेऊन मरण्यास सांगत शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आहे.
या सततच्या छळाला कंटाळून नागोठणे ते वडखळ प्रवासादरम्यान निडी गावाच्या हद्दीत रिक्षामध्ये असताना तरुणीने पॅराक्वॉट हे तणनाशक औषध प्राशन केले. तिला तातडीने पेण येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पारखे पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)