इराणवरील हल्ल्याने प्रादेशिक युद्ध भडकण्याचा धोका; नेतान्याहूंना इस्रायली लष्कराचा इशारा
जेरुसलेम, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : इराणवर लष्करी हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम इस्रायलला भोगावे लागू शकतात, असा इशारा इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. इराणवरील संभाव्य हल्ल्यामु
इराणवरील हल्ल्याने प्रादेशिक युद्ध भडकण्याचा धोका; नेतान्याहूंना इस्रायली लष्कराचा इशारा


जेरुसलेम, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : इराणवर लष्करी हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम इस्रायलला भोगावे लागू शकतात, असा इशारा इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. इराणवरील संभाव्य हल्ल्यामुळे केवळ इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षापुरती परिस्थिती मर्यादित न राहता संपूर्ण पश्चिम आशियात व्यापक युद्ध भडकण्याची शक्यता लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या आठवड्यात नेतान्याहू आणि वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांमध्ये बंद दाराआड झालेल्या बैठकीत इराणवरील संभाव्य लष्करी कारवाईचे परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांवर चर्चा झाली. इस्रायल सध्या इराणविरोधातील लष्करी पर्यायांचा गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

इस्रायलच्या लष्करी गुप्तचर विभागाने दिलेल्या आकलनानुसार, इराणवर हल्ला झाल्यास लेबनॉन, सीरिया आणि गाझासह अनेक आघाड्यांवर संघर्ष तीव्र होऊ शकतो. त्यामुळे इस्रायलला एकाच वेळी अनेक ठिकाणी लष्करी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. हे आकलन नेतान्याहू आणि मोसादच्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा वेगळे असल्याचे म्हंटले आहे.

त्यांच्या मते, संभाव्य लष्करी मोहीम तीन ते पाच दिवसांत संपुष्टात येऊ शकते.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अविग्दोर लिबरमन यांनी अलीकडेच नेतान्याहू अमेरिकेची मंजुरी न घेताही इराणवर एकतर्फी हल्ला करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे संकेत दिले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत इस्रायलने इराणवर हल्ला करणे अयोग्य ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. असा कोणताही निर्णय घेतल्यास त्यामागे राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा राजकीय हेतू असण्याची शक्यता असल्याची टीकाही त्यांनी केली. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील चर्चेबाबत आयडीएफने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

ट्रम्प यांच्या भूमिकेकडे इस्रायलचे लक्ष

वृत्तातील एका अज्ञात सूत्राच्या दाव्यानुसार, नेतान्याहू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इराणविरोधात लवकरात लवकर लष्करी कारवाई करण्यासाठी दबाव आणत होते. मात्र, ट्रम्प यांनी अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसून, सध्या ते अशा हल्ल्याच्या बाजूने नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इराणविरोधातील संभाव्य कारवाईबाबत अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

राष्ट्रीय एकता सरकार स्थापनेची नेतान्याहूंची मागणी

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला नेतान्याहू यांनी इस्रायलमध्ये राष्ट्रीय एकता सरकार स्थापन करण्याची मागणी पुन्हा एकदा केली होती. इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी हा इस्रायलच्या सुरक्षेसमोरील गंभीर धोका असल्याचे म्हटले होते.

पूर्वरेकॉर्ड केलेल्या भाषणात नेतान्याहू यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी गादी आयझेनकोट यांना कोणत्याही पूर्वअटींशिवाय राष्ट्रीय एकता सरकार स्थापनेच्या चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

'इस्रायलचा नाश करू इच्छिणारी इराणी राजवट पुन्हा एकदा आपला अण्वस्त्र कार्यक्रम पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रायलच्या अस्तित्वाला असलेला हा धोका कायमचा संपवणे आवश्यक आहे,' असे नेतान्याहू यांनी म्हटले होते.

राष्ट्रीय एकता सरकारमुळे आगामी अनेक वर्षांसाठी इस्रायलच्या सुरक्षेला बळकटी मिळेल, तसेच प्रादेशिक शांतता करारांचा विस्तार करण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला होता.

इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाई, अमेरिकेची भूमिका आणि इस्रायलमधील अंतर्गत राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande