
वॉशिंग्टन, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या तुलारे काउंटीमध्ये संगीत कार्यक्रमादरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तुलारे काउंटी शेरीफ विभागाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, मध्य कॅलिफोर्नियातील स्ट्रॅथमोर या छोट्या शहरात शनिवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संगीत कार्यक्रम सुरू असताना काही संशयितांनी अचानक जमावाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात नऊ जण जखमी झाले.
गोळीबारात २६ वर्षीय तरुणाच्या छातीत गोळी लागली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून रविवारी मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती गंभीर आहे. याशिवाय १९ आणि २२ वर्षीय अन्य दोन जखमींवरही शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित सहा जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
दरम्यान, हा गोळीबार टोळीशी संबंधित असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, संशयितांचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.
या संगीत कार्यक्रमात शेजारील राज्यांमधील कलाकार सहभागी झाले होते. कार्यक्रमाला सुमारे १५० लोक उपस्थित होते. घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, नागरिकांना सध्या कोणताही तातडीचा धोका नसल्याचे तुलारे काउंटी शेरीफ विभागाने स्पष्ट केले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode