गंगा कराराच्या नूतनीकरणासाठी बांगलादेश उत्सुक; मुदत संपण्यापूर्वी भारताकडून चर्चेची अपेक्षा
ढाका, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। १९९६ च्या ऐतिहासिक ‘गंगा पाणीवाटप कराराबाबत’ बांगलादेशची भूमिका आता काहीशी नरमल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी या कराराऐवजी नवीन करार करण्याची मागणी करणाऱ्या ढाक्याला आता १२ डिसेंबर रोजी विद्यमान कराराची मुदत संपण्यापूर्व
गंगा कराराच्या नूतनीकरणासाठी बांगलादेश उत्सुक; मुदत संपण्यापूर्वी भारताकडून चर्चेची अपेक्षा


ढाका, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। १९९६ च्या ऐतिहासिक ‘गंगा पाणीवाटप कराराबाबत’ बांगलादेशची भूमिका आता काहीशी नरमल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी या कराराऐवजी नवीन करार करण्याची मागणी करणाऱ्या ढाक्याला आता १२ डिसेंबर रोजी विद्यमान कराराची मुदत संपण्यापूर्वी, नवी दिल्लीतील राजकीय नेतृत्व कराराच्या नूतनीकरणासाठी औपचारिक चर्चा सुरू करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलेल, अशी अपेक्षा आहे.

बांगलादेश यापूर्वी नवीन कराराच्या मागणीवर ठाम होता.कोरड्या हंगामात मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाची ठोस हमी या नव्या करारात असावी, अशी त्याची भूमिका होती. यासोबतच, या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीने विशेष तांत्रिक समिती स्थापन करावी, अशीही बांगलादेशने मागणी केली होती. दुसरीकडे, सीमापार नद्यांशी संबंधित सर्व वाद आणि प्रश्न, गंगा पाणीवाटप करारासह, सोडवण्यासाठी ‘संयुक्त नदी आयोग’ हीच स्थापित आणि पुरेशी यंत्रणा असल्याची भारताची भूमिका कायम स्पष्ट राहिली आहे.

ढाक्यात कराराच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘बांगलादेश-भारत संयुक्त समिती’च्या ९१ व्या बैठकीनंतर बांगलादेशच्या १० सदस्यीय तांत्रिक समितीचे प्रमुख तसेच पंतप्रधानांचे वित्त आणि नियोजनविषयक सल्लागार राशद तितुमीर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “कराराशी संबंधित सर्व आवश्यक तयारी आम्ही पूर्ण केली आहे. आंतरराष्ट्रीय नदी असलेल्या गंगेच्या पाण्याचे समान आणि न्याय्य वाटप सुनिश्चित करण्यासाठी भारत प्रभावी पावले उचलेल आणि कराराची मुदत संपण्यापूर्वी औपचारिक चर्चा सुरू करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

या महत्त्वपूर्ण बैठकीत चार सदस्यीय भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व भारताच्या संयुक्त नदी आयोगाचे प्रमुख शरद चंद्र यांनी केले, तर सहा सदस्यीय बांगलादेशी प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व अन्वर कादिरी यांनी केले.तितुमीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी २०२६ या वर्षातील कराराच्या अंमलबजावणीशी संबंधित वार्षिक अहवालाला अंतिम स्वरूप दिले. सूत्रांच्या माहितीनुसार, कराराचे नूतनीकरण करायचे की त्याला काही काळासाठी अंतरिम मुदतवाढ द्यायची, तसेच त्यातील अटींबाबत अंतिम निर्णय दोन्ही देशांचे सर्वोच्च राजकीय नेतृत्व घेईल.

चर्चेच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी बांगलादेशचे जलसंपदामंत्री शाहिदुद्दीन चौधरी अनी यांनी अलीकडेच राजनैतिक माध्यमातून आपल्या भारतीय समकक्षांना पत्रही पाठवले आहे.त्यांनी सांगितले की, चर्चा सुरू करण्यासाठी बांगलादेशने जून २०२६ मध्ये उच्चस्तरीय तांत्रिक समिती स्थापन केली असून, या निर्णयाची माहिती भारतालाही दिली आहे.तसेच, भारतानेही आपली तांत्रिक समिती स्थापन केल्यास त्याबाबत ढाक्याला माहिती द्यावी, अशी विनंती बांगलादेशने नवी दिल्लीला केली आहे.बांगलादेश आणि भारत यांच्यात एकूण ५४ सीमापार नद्या आहेत. मात्र, त्यापैकी गंगा ही एकमेव नदी आहे, जिच्या पाणीवाटपासाठी दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय करार करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande