बिसलेरीसह 5 कंपन्यांवर कारवाई, परवाने निलंबित
खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन,एफएसएसएआयची कारवाई नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) 5 कंपन्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत
एफएसएसएआय लोगो


खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन,एफएसएसएआयची कारवाई

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) 5 कंपन्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. यामध्ये वेदांत रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड, लुसिड हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड, एम्बिको आयुर्वेदिक हेल्थकेअर, विटामेडिक हेल्थ न्यूट्रास्युटिकल्स आणि एडोरियल हेल्थकेअर या कंपन्यांचा समावेश आहे.

संबंधित कंपन्यांच्या उत्पादन केंद्रांची तपासणी केली असता अस्वच्छता, मुदत संपलेल्या कच्च्या मालाचा वापर, उत्पादनांची अयोग्य साठवणूक, दिशाभूल करणारी माहिती तसेच अनिवार्य अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

वेदांत रेमेडीजमध्ये अस्वच्छतेचे गंभीर प्रकार

वेदांत रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेडच्या उत्पादन केंद्रात तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. इमारतीची रचना खराब असणे, परिसरात पाणी साचणे, अपुरा प्रकाश आणि कीटक नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसणे अशा त्रुटी निदर्शनास आल्या. तसेच आयुष आणि एफएसएसएआय परवान्याअंतर्गत येणाऱ्या उत्पादनांचे योग्य वर्गीकरण न करता त्यांची एकाच ठिकाणी साठवणूक आणि प्रक्रिया केली जात असल्याचे आढळले. मुदत संपलेले खाद्यपदार्थांचे फ्लेव्हरिंग आणि वैध एफएसएसएआय परवान्याशिवाय तयार करण्यात आलेली उत्पादनेही तपासणीत आढळली. FoSCoS प्रणालीअंतर्गत कंपनीला केवळ 12 टक्के अनुपालन गुण आढळून आले.

लुसिड हेल्थ केअरमध्येही नियमांचे उल्लंघन

लुसिड हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या परिसरातही अस्वच्छता, अयोग्य साठवणूक, अपुरा प्रकाश आणि कीटक नियंत्रणातील निष्काळजीपणा आढळून आला. आयुर्वेदिक आणि न्यूट्रास्युटिकल उत्पादनांची निर्मिती एकाच परिसरात आवश्यक सुरक्षा उपायांशिवाय केली जात होती. कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक स्वच्छता सुविधा तसेच अनिवार्य FoSTaC प्रशिक्षणाचीही कमतरता होती. याशिवाय, वैध मंजुरी किंवा ना हरकत प्रमाणपत्र नसताना 10 री-लेबलर्स कंपनीच्या उत्पादनांवर पुन्हा लेबल लावत असल्याचे आढळले. कंपनीचा अनुपालन गुणांक केवळ 27 टक्के होता.

एम्बिको आयुर्वेदिक हेल्थकेअरमध्ये मुदतबाह्य साहित्य

एम्बिको आयुर्वेदिक हेल्थकेअरच्या तपासणीत भिंती आणि जमिनीची खराब अवस्था, अपुरे वायुवीजन, कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आणि अस्वच्छ उपकरणे आढळली. याशिवाय मुदत संपलेले साहित्य तसेच उत्पादनांची अयोग्य पद्धतीने साठवणूक केल्याचेही समोर आले. कंपनीला 46 टक्के अनुपालन गुण मिळाले.

विटामेडिक आणि एडोरियल हेल्थकेअरवरही कारवाई

विटामेडिक हेल्थ न्यूट्रास्युटिकल्सचे परवानाधारक उत्पादन केंद्र बंद अवस्थेत आढळले. तपासणीवेळी तेथे कोणताही अधिकृत कर्मचारी उपस्थित नव्हता. कंपनीने परवान्यात नवीन पत्त्याची अधिकृत नोंद न करता दुसऱ्या ठिकाणाहून व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळले. विशेष म्हणजे, कंपनीचा परिसर मांस प्रक्रिया करणाऱ्या अन्य खाद्य उत्पादन युनिटसोबत सामायिक होता.दुसरीकडे, एडोरियल हेल्थकेअरचे परवानाधारक व्यावसायिक ठिकाण प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे तपासणीत उघड झाले. संबंधित ठिकाणी बांधकाम सुरू होते. मालमत्तेच्या मालकाने कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. असे असतानाही कंपनीचा एफएसएसएआय परवाना सक्रिय होता. अधिकाऱ्यांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचेही आढळले.

सुधारणा नोटिशींनाही समाधानकारक प्रतिसाद नाही

या प्रकरणातील अनेक कंपन्यांनी त्रुटी दूर करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या नोटिशींना समाधानकारक उत्तर दिले नाही. काही कंपन्यांनी अनुपालन अहवाल सादर केले नाहीत, तर काहींनी सुधारात्मक उपाययोजना केल्याचे पुरावेही उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे अन्न सुरक्षेच्या गंभीर उल्लंघनांचा विचार करून पाचही कंपन्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. स्वच्छता, उत्पादन प्रक्रियेतील सुरक्षितता, पारदर्शक लेबलिंग, वैध परवाने आणि आवश्यक नोंदी ठेवण्याबाबत एफएसएसएआयने कठोर भूमिका घेतली आहे.

बिसलेरीच्या पाण्याचा नमुना असुरक्षित; कायदेशीर कारवाईला मंजुरी

दरम्यान, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या नमुन्याच्या प्रयोगशाळेतील तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर FSSAI ने बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे. प्राथमिक तपासणीत पाण्याच्या नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले होते. कंपनीने अपील केल्यानंतर हा नमुना रेफरल फूड लॅबोरेटरीकडे पाठविण्यात आला. तेथे पॉलीन्यूक्लियर अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) या रासायनिक घटकांची उपस्थितीही नोंदविण्यात आली. त्यामुळे संबंधित नमुना पुन्हा असुरक्षित घोषित करण्यात आला.

कंपनीचा खुलासा; पाणी सुरक्षित असल्याचा दावा

या प्रकरणावर बिसलेरी कंपनीने स्पष्टीकरण देताना सांगितले की, हे प्रकरण सप्टेंबर २०२५ मध्ये गोव्यातील कंपनीच्या उत्पादन केंद्रात तयार करण्यात आलेल्या एका विशिष्ट बॅचशी संबंधित आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 30 सप्टेंबर 2025 रोजी एफएसएसएआयने एकूण सहा नमुने घेतले होते. त्यापैकी पाच नमुने सर्व निर्धारित निकषांनुसार योग्य ठरले, तर सहाव्या नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण 12 मायक्रोग्रॅम प्रति लिटर आढळले. निर्धारित मर्यादा 10 मायक्रोग्रॅम प्रति लिटर आहे. कंपनीने पुढे सांगितले की, 22 नोव्हेंबर 2025 रोजी अपीलनंतर रेफरल प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचे आढळले; मात्र त्याच नमुन्यात PAHs ची उपस्थिती नोंदविण्यात आली.

त्यानंतर बिसलेरीने एफएसएसएआय मान्यताप्राप्त स्वतंत्र प्रयोगशाळेत त्याच नमुन्याची तपासणी केली. या तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचे स्पष्ट झाल्याचा कंपनीचा दावा आहे.बिसलेरीच्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारी 2026 रोजी स्वतंत्र प्रयोगशाळेचा अहवाल एफएसएसएआयच्या पश्चिम विभागीय कार्यालयात सादर करण्यात आला होता. त्यानंतर कोणतीही सूचना प्राप्त न झाल्याने हे प्रकरण बंद झाले असावे, असे कंपनीला वाटले. कंपनीने आपल्या दहा टप्प्यांच्या उत्पादन प्रक्रियेत 90 हून अधिक प्रकारच्या गुणवत्ता चाचण्या केल्या जात असल्याचे सांगितले आहे. तसेच आपले पाणी पिण्यास सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande