
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर (हिं.स.) नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे राष्ट्रपती भवनात भव्य औपचारिक स्वागत करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. शाह यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मानवंदना पथकाची पाहणी केली. याप्रसंगी पंतप्रधान मोदीही उपस्थित होते.
या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी अनुक्रमे भारतीय आणि नेपाळी शिष्टमंडळाच्या सदस्यांची भेट घेतली. शाह यांनी राजघाटलाही भेट दिली आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.
बालेन शाह रविवारी त्यांच्या पहिल्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले. दोन्ही देश त्यांचे एकूण द्विपक्षीय संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि ऊर्जा, कनेक्टिव्हिटी, रेल्वे, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास आणि हवामान बदल यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्याच्या दिशेने काम करत आहेत. ३६ वर्षीय बलेंद्र शाह यांचा हा पहिलाच द्विपक्षीय परदेश दौरा आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत होणाऱ्या त्यांच्या चर्चेत द्विपक्षीय भागीदारीच्या भविष्याची रूपरेषा आखली जाण्याची आणि सहकार्याचे नवीन मार्ग खुले होण्याची अपेक्षा आहे.
बालेन शाह यांच्यासोबत ३५ सदस्यीय उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यादरम्यान नेपाळ-भारत व्यवसाय मंचाचे आयोजनही होणार आहे. खुल्या सीमा, परस्पर विश्वास, सामायिक परंपरा आणि दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधांवर आधारित भारत आणि नेपाळ यांचे अद्वितीय आणि व्यापक संबंध आहेत. विविध क्षेत्रांतील सहकार्याला चालना देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ४० हून अधिक द्विपक्षीय संस्थात्मक यंत्रणा कार्यरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे