नक्षल्यांनी पती हिरावला; पण जगण्याची हिंमत हिरावू शकले नाहीत !
पतीच्या हत्येनंतर ललिता आत्राम यांचा संघर्षमय प्रवास तीन मुलांचे केले संगोपन, एकाला बनविले पोलीस कमलापूर (गडचिरोली), 23 नोव्हेंबर (हिं.स.) : नक्षलवाद्यांनी पतीची निर्घृण हत्या करून संसार उद्ध्वस्त केला; मात्र ललिता आत्राम यांची जगण्याची जिद्द आ
मुलगा हर्षल याच्यासह ललिता आत्राम


पतीच्या हत्येनंतर ललिता आत्राम यांचा संघर्षमय प्रवास

तीन मुलांचे केले संगोपन, एकाला बनविले पोलीस

कमलापूर (गडचिरोली), 23 नोव्हेंबर (हिं.स.) : नक्षलवाद्यांनी पतीची निर्घृण हत्या करून संसार उद्ध्वस्त केला; मात्र ललिता आत्राम यांची जगण्याची जिद्द आणि संघर्ष करण्याची हिंमत हिरावून घेऊ शकले नाहीत. ऐन तारुण्यात वैधव्याचे दुःख वाट्याला आले, तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी खांद्यावर पडली; पण त्या डगमगल्या नाहीत. स्वतः कष्ट करून मुलांना वाढविले, त्यांना शिक्षण दिले आणि मोठ्या मुलाला पोलीस दलात पाठविले. नक्षलवादाच्या हिंसाचाराने एका कुटुंबावर आघात केला; मात्र त्याच हिंसाचारातून एका माऊलीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रेरणादायी प्रवास उभा राहिला.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील शेतकरी कृष्णकांत ऊर्फ किशोर भीमराव आत्राम यांची २१ जुलै २०१२ रोजी नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केली. पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून त्यांना लक्ष्य करण्यात आले. अवघ्या एक एकर शेतीच्या बळावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका सामान्य शेतकऱ्याला केवळ संशयापोटी जीव गमवावा लागला. या घटनेने आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

तीन दिवस नक्षल्यांच्या ताब्यात, अखेर हत्या

नक्षलवाद्यांनी १९ जुलै २०१२ रोजी कमलापूर येथे बैठक घेतली होती. या बैठकीनंतर किशोर आत्राम यांना ताब्यात घेऊन त्यांचे अपहरण करण्यात आले. तब्बल तीन दिवस ते नक्षलवाद्यांच्या ताब्यात होते. अखेर २१ जुलै रोजी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह गावाजवळ आढळून आला. पोलिसांना माहिती पुरवित असल्याचा संशय हेच त्यांच्या हत्येमागचे कारण ठरले. कोणताही ठोस गुन्हा सिद्ध नसताना केवळ संशयाच्या आधारे एका कुटुंबाचा आधार हिरावून घेण्यात आला.

पतीच्या मृत्यूनंतर तीन मुलांची जबाबदारी पेलली

पतीच्या हत्येनंतर ललिता आत्राम यांच्यासमोर तीन मुलांच्या संगोपनासह संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. अशा कठीण परिस्थितीत अनेकांचे अवसान गळाले असते; मात्र ललिता यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. स्वतः कष्ट करून त्यांनी संसाराचा गाडा पुढे नेला. मुलांचे पालनपोषण करतानाच त्यांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले. नक्षलवाद्यांनी पती हिरावून घेतला, पण मुलांचे भविष्य घडविण्याचा निर्धार त्या मोडू शकले नाहीत. त्यांचा मोठा मुलगा आज पोलीस दलात कार्यरत आहे. पतीच्या हत्येने खचून न जाता त्याच व्यवस्थेत मुलाला पोलीस बनविण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.

नक्षलमुक्तीच्या चर्चेत पीडितांच्या वेदनांचे काय ?

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रभाव कमी होणे आणि हिंसाचाराच्या घटनांना आळा बसणे ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. मात्र, नक्षल हिंसाचारात कुटुंबातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांच्या वेदना अद्याप संपलेल्या नाहीत. नक्षलपीडितांना मिळणारी आर्थिक मदत ही त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाची भरपाई ठरू शकत नाही. अनेक पीडित कुटुंबांना उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि भविष्याची चिंता आजही सतावत आहे.

दुसरीकडे, हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्यांच्या पुनर्वसनाला विरोध नसला, तरी हिंसाचारात सर्वस्व गमावलेल्या पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनालाही तितकेच प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. ज्यांनी हिंसाचारात आपले प्रियजन गमावले, त्यांच्या आयुष्यातील पोकळी कोणतीही आर्थिक मदत भरून काढू शकत नाही.

त्यामुळे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासोबतच पीडितांच्या सन्मानजनक जगण्याची आणि त्यांच्या मुलांच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारीही शासनाने तितक्याच गांभीर्याने घ्यायला हवी. किशोर आत्राम यांच्या हत्येची घटना नक्षलवादाच्या क्रूर चेहऱ्याचीआठवण करून देते; तर ललिता आत्राम यांचा संघर्ष या हिंसाचारापुढे न झुकणाऱ्या सामान्य माणसाच्या जिद्दीचे दर्शन घडवतो. पती गमावूनही तीन मुलांचे भविष्य घडविणारी ही माऊली कमलापूर परिसरासाठी संघर्ष, धैर्य आणि मातृत्वाचा जिवंत प्रेरणादायी आदर्श ठरली आहे

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande