ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतर जेन्सेन हुआंग यांची एनव्हिडियात पुन्हा सीईओपदी नियुक्ती
वॉशिंग्टन, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।जगातील आघाडीची चिप उत्पादक कंपनी एनव्हिडियामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. कंपनीने आपले सहसंस्थापक जेन्सेन हुआंग यांची अवघ्या ११ दिवसांनंतर पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. याप
ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतर जेन्सेन हुआंग यांची एनव्हिडियात पुन्हा सीईओपदी नियुक्ती


वॉशिंग्टन, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।जगातील आघाडीची चिप उत्पादक कंपनी एनव्हिडियामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. कंपनीने आपले सहसंस्थापक जेन्सेन हुआंग यांची अवघ्या ११ दिवसांनंतर पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी एका चिनी महिलेसोबतच्या कथित संबंधांचा खुलासा झाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांना पदावरून हटवले होते. मात्र, हुआंग यांच्या पुनरागमनाची बातमी समोर येताच एनव्हिडियाच्या समभागांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. एकाच व्यापारी सत्रात कंपनीच्या बाजारमूल्यात तब्बल ९५२ अब्ज डॉलरची ऐतिहासिक वाढ नोंदवण्यात आली.

वृत्तांनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विशेष हस्तक्षेपामुळे हुआंग यांचे कंपनीत पुनरागमन शक्य झाले. ट्रम्प यांनी स्वतः संचालक मंडळातील सदस्यांशी संपर्क साधून हुआंग यांच्या बाजूने भूमिका मांडली होती. अमेरिकेच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा आणि चीनसोबत सुरू असलेल्या आर्थिक स्पर्धेत हुआंग यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. वृत्तानुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या काही व्यक्तींनी सांगितले की, हुआंग यांनी कंपनी सोडल्यास शेअर बाजार आणि अमेरिकेच्या व्यापक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, याची ट्रम्प यांना चिंता होती.अखेर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि जागतिक एआय स्पर्धेत अमेरिकेला एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला मुकावे लागू नये,यासाठी एनव्हिडियाच्या प्रमुखांना पुन्हा पदावर आणणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष ट्रम्प यांनी काढला.कंपनीच्या संचालक मंडळाने यापूर्वी सार्वजनिकरीत्या हुआंग यांचे वर्तन 'कंपनीच्या आचारसंहितेच्या, मानकांच्या आणि सांस्कृतिक मूल्यांच्या विरोधात' असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांची पुनर्नियुक्ती हा आधीच्या निर्णयाच्या अगदी उलट असल्याचे मानले जात आहे.

ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्यावर संचालक मंडळातील सदस्यांची समजूत काढण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर व्हान्स यांनी प्रशासनाचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावली. सिलिकॉन व्हॅलीतील आपल्या संपर्कांचा वापर करून त्यांनी संचालक मंडळातील सदस्यांना निर्णयाचा फेरविचार करण्यास प्रवृत्त केले.सिलिकॉन व्हॅलीमध्ये कामाचा अनुभव असलेल्या व्हान्स यांनी सलग ७२ तास हुआंग आणि कंपनीच्या संचालक मंडळाशी थेट समन्वय साधला. तसेच, सीईओने अन्य कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले आहे किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केला आहे, असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सरकारला मिळालेला नाही, अशी ग्वाही त्यांनी संचालक मंडळाला दिली.

माध्यमांच्या वृत्तानुसार, या संपूर्ण प्रक्रियेत वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक आणि अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचाही सहभाग होता. माहितीनुसार, अमेरिकेचे ॲटर्नी जनरल टॉड ब्लँच आणि राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक जे. क्लेटन यांनीही हुआंग यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कोणताही बेकायदेशीर पुरावा नसल्याचे स्पष्ट केले.सोमवारी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी या प्रकरणातील आपली भूमिका मान्य केली. ते म्हणाले, 'माझा हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा ठरला, असे मला वाटते. संचालक मंडळाने आम्हाला अपेक्षित असलेलाच निर्णय घेतला. आमचा एक उत्कृष्ट तारा पुन्हा कामावर परतला आहे.'

हुआंग यांचे कंपनीत पुनरागमन झाले असले, तरी अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने कठोर भूमिका घेत 'मेगास्पीड' या कंपनीचा अमेरिकेच्या 'एंटिटी लिस्ट'मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, एनव्हिडियाचे संचालक मंडळ राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अंतर्गत चौकशी सुरूच ठेवणार आहे.जेन्सेन हुआंग यांचे कंपनीत पुन्हा स्वागत करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कॅलिफोर्नियातील कंपनीच्या मुख्यालयात पोहोचताच कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत त्यांचे जोरदार स्वागत केले. हुआंग यांच्या पुनर्नियुक्तीवर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एनव्हिडियामधील आपल्या ओळखीचे सर्व कर्मचारी हुआंग यांना पुन्हा कंपनीत आणण्याच्या बाजूने होते, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, हुआंग यांच्या पुनरागमनाचा परिणाम तातडीने दिसून आला. एनव्हिडियाच्या समभागांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीच्या इतिहासातील हा तिसरा सर्वोत्तम व्यापारी दिवस ठरला. या तेजीमुळे कंपनीच्या बाजारमूल्यात तब्बल ९५२ अब्ज डॉलरची भर पडली.नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांकातही ६.५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. 'फोर्ब्स'च्या अंदाजानुसार, हुआंग यांची एकूण संपत्ती सुमारे १४३ अब्ज डॉलर इतकी आहे. एका दिवसात त्यांच्या संपत्तीत ३३ अब्ज डॉलरची वाढ झाली.

दरम्यान, येत्या गुरुवारी हुआंग अमेरिकेच्या सिनेटच्या बँकिंग समितीसमोर साक्ष देणार आहेत. यावेळी त्यांच्या वैयक्तिक वर्तनाबाबत, चीनसंदर्भातील एनव्हिडियाच्या धोरणाबाबत तसेच या संपूर्ण प्रकरणात ट्रम्प प्रशासनाने केलेल्या हस्तक्षेपाबाबत त्यांना प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande