दक्षिण कोरिया-रशिया लष्करी तणावात वाढ
रशियन विमानांच्या घुसखोरीनंतर सोलकडून लष्करी अताशेला समन्स दक्षिण कोरियाची लढाऊ विमाने तैनात, उलेंग बेटावर सतर्कतेचा इशारा सियोल, २४ नोव्हेंबर (हिं.स.) : दक्षिण कोरिया आणि रशिया यांच्यातील लष्करी तणाव पुन्हा वाढला आहे. रशियाची अनेक लष्करी विमाने
दक्षिण कोरियाच्या हवाई क्षेत्रात रशियन विमानांची घुसखोरी; दक्षिण कोरियाने मॉस्कोला बजावले


रशियन विमानांच्या घुसखोरीनंतर सोलकडून लष्करी अताशेला समन्स

दक्षिण कोरियाची लढाऊ विमाने तैनात, उलेंग बेटावर सतर्कतेचा इशारा

सियोल, २४ नोव्हेंबर (हिं.स.) : दक्षिण कोरिया आणि रशिया यांच्यातील लष्करी तणाव पुन्हा वाढला आहे. रशियाची अनेक लष्करी विमाने दक्षिण कोरियाच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात (केएडीआयझेड) दाखल झाल्यानंतर दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने रशियन लष्करी अताशेला समन्स बजावण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर दक्षिण कोरियाने आपली लढाऊ विमाने तैनात करून संभाव्य परिस्थितीचा सामना करण्याची तयारी दर्शवली.

दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी मुख्यालयाने (जेसीएस) दिलेल्या माहितीनुसार, रशियन लष्करी विमाने दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीजवळ पोहोचताच दक्षिण कोरियाची लढाऊ विमाने हवेत तैनात करण्यात आली. त्यानंतर रशियन विमाने माघारी फिरली. मात्र, या घटनेत नेमकी किती विमाने सहभागी होती आणि त्यांचे प्रकार कोणते होते, याबाबत अधिकृत तपशील देण्यात आलेला नाही.

दरम्यान, दक्षिण कोरियाच्या पूर्व किनारपट्टीजवळील उलेंग बेटावर अल्पकाळासाठी स्थलांतराचा इशारा जारी करण्यात आला होता. एका विमानाने धोकादायक क्षेत्रात प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क केले. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी हा इशारा देण्यात आला आणि अवघ्या तीन मिनिटांनंतर तो मागे घेण्यात आला. नागरिकांना भूमिगत ठिकाणी किंवा इमारतींमध्ये सुरक्षित आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सुरुवातीच्या घोषणांमध्ये परदेशी विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर संयुक्त लष्करी मुख्यालयाने स्पष्ट केले की, संबंधित विमानांनी दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीत प्रवेश केला नव्हता. त्यांनी केवळ धोकादायक क्षेत्रात प्रवेश करून माघार घेतली होती.

रशियन विमानांचा उलेंग बेटावरील सतर्कतेच्या इशाऱ्याशी नेमका संबंध होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या विमानांची ओळख आणि त्यांची संख्या याबाबतही लष्कराने माहिती जाहीर केलेली नाही. या घटनेत कोणताही अपघात किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. उलेंग बेटावर सुमारे नऊ हजार नागरिक वास्तव्यास आहेत.

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या आठवणी ताज्या

उत्तर कोरियासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उलेंग बेटावर यापूर्वीही अशा प्रकारचे सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये उत्तर कोरियाने समुद्रात २० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यापैकी एक क्षेपणास्त्र उलेंग बेटाच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे वाजवण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.

आठवडाभरात दुसऱ्यांदा रशियन विमानांचा प्रवेश

अवघ्या आठवडाभरापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. कोरियन द्वीपकल्प आणि जपानदरम्यानच्या सागरी क्षेत्रात रशियन लष्करी विमानांनी दक्षिण कोरियाच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यावेळीही दक्षिण कोरियाला आपली लढाऊ विमाने तैनात करावी लागली होती.

याच दिवशी जपाननेही आपल्या नैऋत्य किनारपट्टीजवळ रशियन विमानांच्या कथित हवाई हद्द उल्लंघनाच्या मुद्द्यावरून मॉस्कोकडे तीव्र निषेध नोंदवला होता. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पूर्व आशियातील हवाई आणि सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande