शेख हसीना दहशतवादी, हातकड्या घालूनच बांगलादेशात परतावे लागेल ; बांगलादेश सरकारचा इशारा
ढाका, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी १६ डिसेंबर रोजी मायदेशी परतण्याची व्यक्त केलेली इच्छा वास्तवाशी सुसंगत नाही. त्या बांगलादेशात परतू शकतात, मात्र केवळ हातकड्या घालून आणि दहशतवादी म्हणूनच, असे बांगलादेश सरक
‘शेख हसीना दहशतवादी, हातकड्या घालूनच बांगलादेशात परतावे लागेल’; बांगलादेश सरकारचा कठोर इशारा


ढाका, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी १६ डिसेंबर रोजी मायदेशी परतण्याची व्यक्त केलेली इच्छा वास्तवाशी सुसंगत नाही. त्या बांगलादेशात परतू शकतात, मात्र केवळ हातकड्या घालून आणि दहशतवादी म्हणूनच, असे बांगलादेश सरकारने स्पष्ट केले आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री हुमायून कबीर यांनी हसीना यांच्यावर दहशतवादाचे आरोप पुन्हा केले आहेत. ते म्हणाले, बांगलादेशातील लोक दहशतवादाचा केवळ एकच प्रकार ओळखतात आणि तो म्हणजे शेख हसीना यांनी प्रायोजित केलेला अवामी दहशतवाद. त्या दोषी गुन्हेगार असून फरार दहशतवादी आहेत. ते पुढे म्हणाले, स्वतःची अस्वस्थता दूर करण्यासाठी त्या पैसे देऊन किंवा इतरांच्या मदतीने आपल्या मनासारख्या बातम्या प्रसिद्ध करू शकतात. मात्र, वास्तव आणि इच्छा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. वास्तव हे आहे की, एखाद्या दहशतवाद्याला प्रत्यार्पणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने मायदेशी परतण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यांच्या इच्छेबद्दल बोलायचे झाले, तर त्या झोपेतही अशी स्वप्ने पाहत असाव्यात की, मी बांगलादेशात परत जात आहे किंवा विमानाने मायदेशी येत आहे.

शेख हसीना यांनी मायदेशी परतण्याची निश्चित तारीख जाहीर केल्यानंतर तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे. यामुळे देशातील राजकीय आणि कायदेशीर तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, या महिन्याच्या सुरुवातीला हसीना यांनी नवीन पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांची मागणी केल्यानंतर देशातील हिंसाचारातही वाढ झाली आहे.

बांगलादेश सरकारने त्यांच्याविरोधातील उठावानंतर देश सोडून दिल्लीला गेल्यानंतर रद्द करण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे पुन्हा उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी हसीना यांनी केली आहे. तसेच, राष्ट्रीय विमान कंपनी बिमान बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानातून आपल्या मायदेशी परतण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सरकारला सांगितले आहे. मात्र, सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, त्यांना केवळ भारतामार्फत प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेद्वारेच बांगलादेशात आणले जाऊ शकते. हसीना यांची मागणी फेटाळताना कबीर म्हणाले की, नाही, त्या सर्वसामान्य व्यावसायिक प्रवाशांप्रमाणे प्रवास करू शकत नाहीत. त्यांना केवळ हातकड्या घालून किंवा कडक सुरक्षेतच बांगलादेशात आणले जाऊ शकते.

बांगलादेशच्या एका मंत्र्याने रविवारी वृत्तसंस्थाला सांगितले की, शेख हसीना मायदेशी परतल्यास त्यांना अटक करून तुरुंगात पाठवले जाईल. तसेच, त्यांना बांगलादेशात परत आणण्यासाठी विमान पाठवण्याबाबत भारतासोबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही.

गेल्या वर्षी बांगलादेशातील एका न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेला उठाव चिरडण्यासाठी घातक कारवाईचे आदेश दिल्याच्या आरोपाखाली शेख हसीना यांना त्यांच्या अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, सध्या देशाबाहेर वास्तव्यास असलेल्या हसीना यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावणाऱ्या बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचे मुख्य सरकारी अभियोक्ता अमीनुल इस्लाम यांनीही त्यांच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली. दोषी ठरलेल्या आणि फरार असलेल्या व्यक्तीने सरकारने आपल्या मायदेशी परतण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा करणे अतार्किक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande