
अबुधाबी, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) सात अमिरातींपैकी एक असलेल्या रास अल खैमाह येथे प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या गृह मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर जारी केलेल्या निवेदनानुसार, अल वतन रोडवर बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि नागरी संरक्षण दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातस्थळ सुरक्षित करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी केले.
या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून, योग्य वेळी यासंदर्भातील अधिकृत माहिती जाहीर केली जाईल, असे मंत्रालयाने सांगितले. तसेच, या घटनेबाबत माहिती प्रसारित करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवावा आणि अफवा किंवा अपुष्ट बातम्या पसरवू नयेत, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.या महिन्यात यूएईमध्ये झालेला हा सर्वात मोठा रस्ते अपघात आहे.
यापूर्वी १२ नोव्हेंबर रोजी फुजैराह येथील शेख खलिफा बिन झायेद रोडवर १८ कार आणि पाच ट्रक एकमेकांवर आदळले होते. या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३० जण जखमी झाले होते. तपासकर्त्यांनी एकाच ठिकाणी झालेल्या दोन अपघातांची माहिती दिली होती. पहिल्या अपघातात एका वाहनाची उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली होती. तर दुसऱ्या अपघातात दोन मालवाहू कंटेनर घेऊन जाणारा ट्रक अनेक वाहनांना धडकल्यानंतर उलटला होता.
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये आठ अमिराती नागरिक, सात भारतीय, सहा ओमानी, तीन इजिप्शियन, दोन जॉर्डनचे नागरिक, दोन पाकिस्तानी आणि दोन ब्राझीलचे नागरिक यांचा समावेश होता.दरम्यान, यूएईच्या अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना वारंवार सुरक्षित अंतर राखण्याचे, वेगमर्यादेचे पालन करण्याचे आणि प्रतिकूल परिस्थितीत वाहन चालवताना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode