व्हिएतनाममध्ये हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू , १० जखमी
हनोई, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।व्हिएतनामची राजधानी हनोईतील दाट लोकवस्तीच्या परिसरात मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमींना राजधानीतील तीन रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आल
व्हिएतनाममध्ये हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू , १० जखमी


हनोई, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।व्हिएतनामची राजधानी हनोईतील दाट लोकवस्तीच्या परिसरात मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमींना राजधानीतील तीन रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, रेस्टॉरंटच्या इमारतीचा काही भाग कोसळला, तर आसपासच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून रेस्टॉरंटमधील गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेच्या वेळी रेस्टॉरंट सुरू असल्याने ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हनोईच्या डोंग दा जिल्ह्यातील न्गुयेन वान तुयेत रस्त्यावरील एका हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, रेस्टॉरंटच्या इमारतीचा काही भाग कोसळला. त्याचा परिणाम शेजारील इमारती आणि रस्त्याच्या पलीकडे असलेल्या घरांवरही झाला.

हनोईच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर सेंट पॉल जनरल हॉस्पिटल, डोंग दा जनरल हॉस्पिटल आणि हनोई मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल या तीन रुग्णालयांमध्ये आपत्कालीन उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एका व्यक्तीचा डोंग दा जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राथमिक अहवालानुसार, ही व्यक्ती स्फोटाच्या वेळी रेस्टॉरंटजवळून जात होती. स्फोटामुळे उडालेल्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने ती गंभीर जखमी झाली होती.

स्फोटानंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी बचावकार्यात सहभाग घेतला. त्यांनी ढिगाऱ्याखालून मृत आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. दरम्यान, बचाव पथकांनी घटनास्थळी शोधमोहीम सुरू केली असून रेस्टॉरंटच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकले असण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस आणि बचाव कर्मचारी विशेष उपकरणांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत. काँक्रीटचे मोठे तुकडे हटवण्यासाठी हायड्रॉलिक यंत्रांचा वापर केला जात आहे.स्फोटामुळे कमकुवत आणि असुरक्षित झालेल्या आसपासच्या इमारती प्रशासनाने तातडीने रिकाम्या केल्या आहेत. अधिकृत पथकांकडून इमारतींच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव आपली घरे सोडावी लागली आहेत, त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्थाही करण्यात येत आहे.

दरम्यान, हनोईतील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या स्फोटानंतर सरकारने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, हा स्फोट गॅस गळतीमुळेच झाला होता का, याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या बचाव पथकांचे मुख्य लक्ष ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे आणि परिसरातील इमारती सुरक्षित करणे यावर आहे.

व्हिएतनाममध्ये गॅसशी संबंधित आणखी एका मोठ्या दुर्घटनेनंतर दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधीत हनोईमध्ये ही घटना घडली आहे. १३ नोव्हेंबर रोजी हो चि मिन्ह शहरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एक इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर १२ जण जखमी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande