
लातूर, 24 नोव्हेंबर, (हिं.स.)। ऐन दुष्काळाच्या आणि सणासुदीच्या काळात औसा तालुक्यातील तब्बल २ हजार ९०० रेशनकार्डधारक कुटुंबांचा धान्यपुरवठा बंद करण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 'मिशन सुधार अभियानांतर्गत' अपात्र, बोगस आणि निष्क्रिय रेशनकार्डधारकांची नावे वगळण्यात आल्याने संबंधित कुटुंबांना मोठा फटका बसला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणून खऱ्या गरजू लाभार्थ्यांनाच स्वस्त व मोफत धान्याचा लाभ मिळावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यानुसार रेशनकार्डला आधार जोडणी, ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सहा ते बारा महिने धान्य न उचलणारे, निर्धारित उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असणारे, कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असणारे तसेच आयकर भरणारे किंवा व्यावसायिक जीएसटी विवरणपत्र दाखल करणारे लाभार्थी तपासणीच्या कक्षेत आले आहेत. याशिवाय पाच एकरांपेक्षा अधिक सिंचनाखालील जमीन, शहरात शंभर चौरस मीटरपेक्षा अधिक जागा, एकाच व्यक्तीच्या नावावर दोन रेशनकार्ड, बनावट कागदपत्रांद्वारे मिळवलेली कार्ड तसेच स्थलांतरित कुटुंबांच्या कार्डावरही कारवाई करण्यात आली आहे.
औसा तालुक्यातील ६४ हजार ७३३ लाभार्थ्यांपैकी पहिल्या टप्यात २ हजार ९०० रेशनकार्डधारकांची नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे संबंधित कुटुंबांचा धान्यपुरवठा खंडित झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis