
इस्लामाबाद, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) बलुचिस्तानमध्ये केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये २० पाकिस्तानी सैनिक आणि कथित सहकाऱ्यांना ठार केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोमवारी जारी केलेल्या निवेदनात बीएलएचा प्रवक्ता जियान्द बलुच याने सांगितले की, २१ नोव्हेंबर रोजी नुश्की येथील हझदा खोल भागात पाकिस्तानी लष्कराच्या ९३ विंग छावणीवर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या संघटनेचे हवाई पथक काहर आणि फतेह पथक सहभागी होते.
निवेदनात म्हटले आहे की, काहर पथकाने हल्ल्याची सुरुवात केली, तर इतर लढाऊ पथकांनी अवजड आणि अन्य शस्त्रांचा वापर करून अनेक दिशांनी पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवला. बीएलएच्या दाव्यानुसार, या हल्ल्यादरम्यान त्यांच्या हवाई पथकाने लष्करी तळांवर ड्रोनच्या साहाय्याने ११ हल्ले केले. यामध्ये छावणीतील आठ जवान ठार, तर अन्य सात जण जखमी झाले.
वृत्तानुसार, रेको आणि हारुनी येथील लष्करी छावण्यांना मदत पोहोचवण्यासाठी पाठवण्यात आलेल्या लष्करी ताफ्यांनाही आपल्या लढवय्यांनी लक्ष्य केल्याचा दावा संघटनेने केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, रेको येथे पाकिस्तानी लष्कराचे तीन जवान ठार, तर किमान चार जण जखमी झाले. हारुनी येथे बीएलएच्या नेमबाजांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान जागीच ठार झाले.
बीएलएच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या लढवय्यांनी जरीन जंगलातील एक पूल स्फोट घडवून उडवून दिला. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला अनेक तास अतिरिक्त कुमक पाठवता आली नाही. नुश्की येथील कारवाईत १३ सैनिक ठार, तर ११ हून अधिक जखमी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.याशिवाय, त्याच दिवशी त्यांच्या लढवय्यांनी मस्तुंगमधील गुरगिना भागातून पुढे सरकणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. संघटनेच्या दाव्यानुसार, पाकिस्तानी लष्करावर आयईडीच्या साहाय्याने हल्ला केल्यानंतर तीन ठिकाणी सशस्त्र हल्ले करण्यात आले. यामध्ये लष्कराचे पाच जवान ठार, तर अनेक जण जखमी झाले. तसेच त्यांच्या वाहनांचेही नुकसान झाले.
बीएलएने पाकिस्तानी सुरक्षा दलांवर नागरी वस्त्यांमध्ये मोर्टारने हल्ले करणे आणि दुकानांना आग लावण्याचे आरोपही केले आहेत. संघटनेने सांगितले की, २२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या लढवय्यांनी चगाई जिल्ह्यातील तालो बर्तगजी परिसरात क्वेटा-ताफतान व्यापारी मार्ग रोखला. यावेळी वाहनांची तपासणी करून दोन व्यावसायिक वाहने ताब्यात घेण्यात आली.
या भागात लष्करी ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही बीएलएने स्वीकारली आहे. मात्र, या हल्ल्यात किती जणांचा मृत्यू झाला किंवा किती जण जखमी झाले, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.त्याच दिवशी घडलेल्या अन्य घटनांबाबतही संघटनेने दावे केले आहेत. बुलेदा येथील जंतरी भागात दबा धरून केलेल्या हल्ल्यात एका सैनिकाला ठार केल्याचे, तर किल्ला अब्दुल्ला येथील गजाबंदजवळ नेमबाजाने केलेल्या हल्ल्यात 'डेथ स्क्वॉड'चा सदस्य असल्याचा दावा केलेल्या एका व्यक्तीला ठार केल्याचे बीएलएने म्हटले आहे.
पाकिस्तानी सुरक्षा दल, लष्करी तळ आणि कथित स्थानिक हस्तकांविरोधातील आपली जमिनीवरील तसेच हवाई कारवाई पूर्ण तीव्रतेने सुरूच राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे. बलुचिस्तानमधून पाकिस्तानी लष्कर पूर्णपणे माघार घेईपर्यंत आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळेपर्यंत आधुनिक युद्धतंत्राचा वापर करून या कारवाया सुरू राहतील, असेही संघटनेने स्पष्ट केले.
दरम्यान, रविवारी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने (बीएलएफ) २ ते २१ नोव्हेंबरदरम्यान संपूर्ण बलुचिस्तानमध्ये राबवलेल्या २१ मोहिमांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे ३६ जवान आणि सरकारसमर्थक सशस्त्र गटाच्या एका कथित सदस्याला ठार केल्याचा दावा केला होता.बीएलएफचा प्रवक्ता मेजर ग्वाहराम बलुच याच्या म्हणण्यानुसार, १७ नोव्हेंबर रोजी खुजदार येथे लष्करी ताफ्यांवर करण्यात आलेल्या तीन स्वतंत्र हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे २० सुरक्षारक्षक ठार झाले. वृत्तानुसार, क्वेटा-कराची महामार्गावरील अंजिरा, जीवा आणि लखोरियन येथे हे हल्ले करण्यात आले. याशिवाय, लढवय्यांनी राष्ट्रीय डेटाबेस आणि नोंदणी प्राधिकरणाच्या (नाद्रा) एका कार्यालयालाही आग लावल्याचा दावा करण्यात आला आहे.
बीएलएफच्या म्हणण्यानुसार, १० नोव्हेंबर रोजी हाजी शहराजवळ दबा धरून केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांचे आठ जवान ठार झाले. तर १६ नोव्हेंबर रोजी नुश्की आणि खारान येथे झालेल्या हल्ल्यांमध्ये अनुक्रमे चार आणि तीन जवान मारले गेले. तसेच १२ नोव्हेंबर रोजी मस्तुंग येथे नेमबाजाने केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचा एक जवान ठार झाल्याचाही दावा संघटनेने केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode