संविधानातून झाली... लोकशाहीची मुहूर्तमेढ
मित्रहो, भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं,पण त्यासाठी अनेक जहाल क्रांतिवीरांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.तर दुसरीकडे महात्मा गांधी यांनी अहिंसा व सत्याग्रह या द्वय तत्वांच्या आधारे स्वराज्यासाठी लढा दिला.त्याची परिणिती म्हणजे १५ ऑगस्ट १९४७
संविधान


मित्रहो, भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं,पण त्यासाठी अनेक जहाल क्रांतिवीरांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.तर दुसरीकडे महात्मा गांधी यांनी अहिंसा व सत्याग्रह या द्वय तत्वांच्या आधारे स्वराज्यासाठी लढा दिला.त्याची परिणिती म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट संपुष्टात आली.

तथापि, स्वतंत्र देशाचा राज्यकारभार सनदशीर मार्गाने चालविण्यासाठी ‘राज्यघटना’ तयार करणं क्रमप्राप्तच ठरते.अर्थातच ‘देशाच्या राज्यकारभाराला दिशा दाखविणारा सर्वोच्च कायदा (बेसिक लॉ) म्हणजे राज्यघटना होय’. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ यांचे अधिकार व कार्यप्रणाली कशी असावी. राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ तसेच राज्यपाल, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांचे अधिकार व कर्तव्ये कोणते, नागरिकांचे मूलभूत अधिकार व त्यांच्या रक्षणाची हमी आणि नागरिकांची कर्तव्ये यासंबंधी मार्गदर्शन करणारा मूलभूत कायदा म्हणजे राज्यघटना होय.

प्रिय बंधू-भगिनींनो, राज्यघटना तयार करण्यासाठी सर्वप्रथम घटना समितीची स्थापना करण्यात आली. डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी या समितीचे अध्यक्ष पद भूषविले. तदनंतर एक मसुदा समिती तयार केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सदर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करत, त्यात विविध क्षेत्रातील काही निवडक तज्ज्ञ मान्यवरांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी विविध देशांचे दौरे करून तेथील राज्यघटनांमधील तरतुदींचा सखोल अभ्यास केला. याशिवाय देशांतर्गत विविध राज्यांच्या भाषा, भौगोलिक परिस्थिती व संस्कृती यांची माहिती संकलित करण्यासाठी मसुदा समितीचे सन्माननीय अध्यक्ष व सदस्यांनी राज्यांचेही अभ्यास दौरे केले. प्रत्यक्षात या कामास २९ ऑगस्ट १९४७ रोजी शुभारंभ झाला. हे महत्वपूर्ण काम २ वर्षे ११ महिने १८ दिवस अविरत सुरू राहिले. यात ४३१ कलमे व १२ परिशिष्टे यांचा समावेश करण्यात आला.

अखेर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांना घटना सुपूर्द केली अन् लगेचच ती स्विकृत करण्यात आली.त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात येऊन भारत देश ‘सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य’ म्हणून नावरूपाला आला.त्याच दिवसापासून स्वतंत्र भारताची राज्यघटना अमलात आली अन् हिंदुस्थानाने एका नव्या युगात प्रवेश केला.या नवनिर्मित राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वधर्मीय नागरिकांना मतदानाचा अधिकारसह अन्य मूलभूत अधिकार(Fundamental rights) बहाल करण्यात आले.वास्तवात देशामध्ये संसदीय लोकशाहीची हीच खरी मुहूर्तमेढ ठरली.

भारतीय राज्यघटनेची निर्मिती केल्याबद्दल घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यातील सन्माननीय सदस्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसच्या महासभेला संबोधित करताना घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाली की, राज्यकर्त्यांनी देशाशी प्रामाणिक राहून भारताचे सार्वभौमत्व, एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी भरीव योगदान द्यावे.तसेच भारत हे ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ असल्याने प्रत्येक जाती -धर्माविषयी समान आदरभाव असावा. ­‘प्रजासत्ताक राज्य’ निर्मितीसाठी राजकीय लोकशाहीला सामाजिक व आर्थिक लोकशाहीची जोड द्यावी.राज्यघटना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा राज्यकर्त्यांसह नागरिकांनी सदैव आदर बाळगावा. वास्तवात हेच खरे संसदीय लोकशाहीचे पैलू आहेत.

दैनंदिन जीवनात कुठल्याही नागरिकावर अन्याय झाल्यास त्याला ‘न्यायालयात दाद मागण्याचा मूलभूत अधिकार’ दिला. महत्वाचे म्हणजे आपल्या पसंदीचा लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी राज्यघटनेने सर्वधर्मियांना मतदानाचा अधिकार बहाल केला. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार आपल्या दैवताची उपासना करण्याकरिता धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करण्यात आला.तथापि,राज्य हे कुठल्याही धर्माशी घटनात्मकदृष्ट्या बांधील नाही एवं कुठल्याही धर्मात हस्तक्षेप करत नाही, हे स्पष्ट केलं. याशिवाय नागरिकांना कुठल्याही विषयावर आपले मत व्यक्त करण्यासाठी राजघटनेने विचार स्वातंत्र्याचा म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला. तथापि, विचार स्वातंत्र्याचा वापर करताना इतरांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, हे प्रकर्षाने नमूद केलं.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपापला उदरनिर्वाह करण्यासाठी नागरिकांना उद्योग-व्यवसाय, नोकरी करण्याचा अधिकारही बहाल करण्यात आला. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य, कामगार-मालक असा भेदभाव न करता राज्यघटनेने सर्व नागरिकांना समान अधिकार-समान संधी प्रदान केली आहे. अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा आहे. अत: हॉटेल्स, सार्वजनिक करमणुकीची स्थळे, धार्मिक ठिकाणे येथे भेदाभेद न करता प्रत्येकाला प्रवेश देण्यात आला. वास्तविक पहाता, ‘मानवतावाद’ हा खरा संसदीय लोकशाहीचा गाभा आहे, हे राज्यघटनेतून प्रतिबिंबित होते.

राज्यघटनेने विविध प्रवर्गातील मागासवर्गीयांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं. त्याचप्रमाणे विविध आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक व आर्थिक सवलती, सोयी - सुविधा घटनेच्या माध्यमातून देण्यात आल्या. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे राज्यघटनेकडून लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी मागासवर्गीय जाती - जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देण्यात आले. या सर्व बाबींकडे पाहिल्यास ‘संसदीय लोकशाही ही खऱ्या अर्थाने आदर्श राज्यपद्धती आहे’, हे निष्पन्न होते.

घटनेच्या माध्यमातून घटनाकारांनी विविध संप्रदाय(धर्म), भाषा, पंत, संस्कृती, परंपरा, जीवनशैली असलेल्या देशात ‘विविधतेतून एकता’(Unity in Diversity)प्रस्थापित करण्यावर अधिक भर दिला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेतून निर्मित झालेली संसदीय लोकशाही ही सर्वधर्मियांसाठी आणि समाजातील सर्वच वर्गांतील नागरिकांसाठी वरदान ठरली आहे.

प्रत्येक नागरिकाने देशाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवून देशाचे सार्वभौमत्व, अखंडता, एकात्मता यांचे रक्षण करावे.तसेच सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करावे. तर सांस्कृतिक वारसांचे जतन करावे. अरण्य, सरोवर, नद्या, सागर, वन्यजीवसृष्टी अन् नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करावे. राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करावी आणि वेळप्रसंगी देश रक्षणाच्या कामी तनमनधनाने योगदान द्यावे. देशातील सर्वधर्मीय नागरिकांनी ही मूलभूत कर्तव्ये पार पाडावीत, हे अभिप्रेत आहे, हा मोलाचा सल्ला घटनाकारांनी नागरिकांना दिला.

प्रत्येक नागरिकाने भारतीय प्रजासत्ताकाचा सन्मान करून त्याला अधिक बलशाली करण्यासाठी कटिबद्ध व्हावे. इतकेच नव्हे तर, त्याचे नावलौकिक वाढीस लागेल, यासाठी सदैव प्रयत्नशील रहावे, म्हणजे भारतीय संविधान दिवस साजरा करणे खऱ्या अर्थाने सार्थक ठरेल. देशातल्या सर्वधर्मीय नागरिकांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारतीय संविधान चिरायू होवो! जय भीम !

जय हिंद-जय महाराष्ट्र!

लेखक - डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे,

खासदार, कल्याण लोकसभा क्षेत्र

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande