
कीव, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। रशियाने बुधवारी युक्रेनच्या डोनबास फ्युएल अँड एनर्जी कंपनीच्या (डीटीईके) एका औष्णिक वीज प्रकल्पाला लक्ष्य केले. या हल्ल्यात प्रकल्पातील उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यामुळे वीज निर्मिती पूर्णपणे बंद करावी लागली. युक्रेनियन नॅशनल न्यूजच्या हवाल्याने ही माहिती दिली. नोव्हेंबर महिन्यात कंपनीच्या वीज प्रकल्पांवर झालेला हा तिसरा मोठा हल्ला आहे. रशियाच्या सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या ऊर्जा व्यवस्थेवरील दबाव वाढत आहे.
रशियाने मंगळवारी रात्री निप्रोपेत्रोव्स्क भागातील ऊर्जा सुविधांनाही लक्ष्य केले. या हल्ल्यांमुळे अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. वीज पारेषण यंत्रणेचे संचालक असलेल्या उक्रेनेर्गोच्या निर्देशानुसार, पाच जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन वीजकपात लागू करण्यात आली आहे. निप्रो, निप्रोव्स्की, पावलोहरादस्की, सिनेलनिकीव्स्की आणि समारीव्स्की या जिल्ह्यांमध्ये वीजकपात करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ऊर्जा विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मात्र, रशियाकडून सातत्याने हवाई हल्ल्यांचा इशारा दिला जात असल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. रशियाने रात्रभर आणि बुधवारी सकाळीही युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले सुरूच ठेवले. गोळीबारामुळे तात्पुरत्या रशियन ताब्यात असलेल्या झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पाचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. या वर्षात या प्रकल्पात वीजपुरवठा खंडित होण्याची ही १७वी घटना आहे. तर आतापर्यंत या प्रकल्पाचा वीजपुरवठा एकूण २८ वेळा खंडित झाला आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम आता युरोपपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या लिबियापर्यंत पोहोचले आहेत. रविवारी पूर्व लिबियातील बेनगाझी नौदल तळावर उभ्या असलेल्या रशियन युद्धनौकेवर युक्रेनच्या ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन लिबियन नौदल अधिकाऱ्यांचा मंगळवारी संध्याकाळी मृत्यू झाला. स्वघोषित लिबियन नॅशनल आर्मीने (एलएनए) मंगळवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनातून या वृत्ताला दुजोरा दिला.युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या मोहिमेत सात ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे सांगितले होते.
लिबियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इंधन भरण्यासाठी आणि आवश्यक साहित्य घेण्यासाठी रशियन युद्धनौका नौदल तळावर आली होती. प्राथमिक तपासानुसार, पश्चिम लिबियातील युक्रेनच्या सैन्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका तळावरून अनेक सागरी ड्रोन सोडण्यात आले होते. त्यापैकी किमान चार ड्रोन अडवून नष्ट करण्यात आले, तर दोन ड्रोन रशियन युद्धनौकेवर आदळले. या हल्ल्यात लिबियन आणि रशियन नागरिकांसह किमान १० जण जखमी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode