इराण-हुतींच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत तणाव; अमेरिकेकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
वॉशिंग्टन , 25 नोव्हेंबर (हिं.स.)।मध्यपूर्वेतील वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने यासंदर्भात इशारा जारी करताना म्हटले आहे की, इराणसमर्थित हुती बंडखोर
मध्यपूर्वेत इराण-हुतींच्या वाढत्या हल्ल्यांमुळे अमेरिकेकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


वॉशिंग्टन , 25 नोव्हेंबर (हिं.स.)।मध्यपूर्वेतील वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने यासंदर्भात इशारा जारी करताना म्हटले आहे की, इराणसमर्थित हुती बंडखोरांकडून सशस्त्र हल्ले होण्याचा धोका वाढला आहे. याशिवाय, इराणकडूनही या भागातील अमेरिकन सरकारी अधिकारी आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मध्यपूर्वेतील विविध देशांमध्ये असलेल्या आपल्या दूतावासांच्या माध्यमातून अनेक निवेदने जारी केली आहेत. त्याद्वारे अमेरिकन नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य सुरक्षा इशारे, विमानसेवा रद्द होणे, हवाई क्षेत्र बंद होणे आणि प्रवासात येणारे अडथळे याबाबत नागरिकांनी सावध राहावे, असेही विभागाने म्हटले आहे.

परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार, इराणने बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन तळांना लक्ष्य करून हल्ले केले आहेत. तर इराणसमर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावरही हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये नागरी विमानतळांसह इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे सामान्य नागरिकांना फटका बसला असून, प्रवासी वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. या भागातील सुरू असलेला संघर्ष अधिक गंभीर रूप धारण करू शकतो, अशी भीती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे एका वित्तीय केंद्रातील टॉवर इमारतीला लक्ष्य करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सौदी नागरी संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, या हल्ल्यात ११ जण जखमी झाले असून, त्यामध्ये दोन भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. सौदी नागरी संरक्षण विभागाच्या महासंचालनालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जखमींमध्ये दोन सौदी नागरिक, दोन भारतीय, तीन नेपाळी आणि चार इजिप्शियन नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यासाठी येमेनमधील हुती बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप सौदी अधिकाऱ्यांनी केला आहे.

दुसरीकडे, इराणने मंगळवारी स्पष्ट केले की, आपल्या सात अटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी कोणतीही चर्चा केली जाणार नाही. या अटींचा अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, इराणच्या सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, निर्बंध हटवणे, इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी संपवणे आणि जप्त केलेली इराणची मालमत्ता मुक्त करणे यांसारख्या मागण्यांचा त्यात समावेश आहे.इराणचे प्रमुख वाटाघाटीकार आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी शत्रूने कोणतीही चूक केल्यास इराण या संघर्षाचा भौगोलिक विस्तार वाढवेल, असा इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande