
इस्लामाबाद, 26 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमधील कराची येथे बांधकाम सुरू असलेली सहा मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, अन्य १४ जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १७ जणांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
कराचीतील बलून कॉलनी परिसरात ही दुर्घटना घडली. माहितीनुसार, बचाव पथकांनी आतापर्यंत ढिगाऱ्यातून १४ जखमींना बाहेर काढले आहे.सरकारी अधिकारी नसरुल्ला अब्बासी यांनी सांगितले की, इमारत कोसळल्यानंतर १७ जण बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला दिली आहे. बचाव पथकांनी सुरुवातीला एका व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी केली होती. मात्र, रात्रभर सुरू असलेल्या बचावकार्यात आणखी तीन मृतदेह सापडले.
मिळालेल्या माहितीनुसार, निवासी वापरासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर ही इमारत बेकायदेशीरपणे बांधली जात होती. सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या बांधकामाबाबत चिंता व्यक्त केली होती आणि संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री शाह यांनी वसीम शमशाद यांना सिंधचे स्थानिक स्वराज्य विभागाचे सचिव आणि सिंध इमारत नियंत्रण प्राधिकरणाचे (एसबीसीए) महासंचालक या दोन्ही पदांवरून हटवण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, शमशाद यांची सेवा केंद्र सरकारकडे परत पाठवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय, शमशाद यांना निलंबित करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यास आणि या प्रकरणाची अधिकृत चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले.
कराचीचे महापौर मुर्तजा वहाब यांनी सांगितले की, सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यावर प्रशासनाचे संपूर्ण लक्ष केंद्रित आहे. मात्र, बेपत्ता असलेल्या नागरिकांच्या संख्येबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.दरम्यान, सरकारी निवेदनानुसार, या दुर्घटनेप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुरुवारी डझनभराहून अधिक अधिकाऱ्यांना त्यांच्या पदांवरून हटवण्यात आले.
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode