
कॅनबेरा, 26 नोव्हेंबर (हिं.स.)।ऑस्ट्रेलियाच्या संसदेने बुधवारी ऑनलाइन सुरक्षेसंदर्भातील एक नवीन आणि कठोर कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार, मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना त्यांच्या डिजिटल व्यासपीठांवर संभाव्य ऑनलाइन धोके रोखण्यात अपयश आल्यास अब्जावधी डॉलरचा दंड ठोठावला जाऊ शकतो.मात्र, या कायद्यामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येण्याची आणि सेन्सॉरशिपचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील विरोधी पक्षांनी दिला आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारच्या निवेदनानुसार, ‘डिजिटल ड्यूटी ऑफ केअर ॲक्ट’ अंतर्गत मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना कोणत्याही प्रकारची हानी होण्यापूर्वीच संभाव्य धोक्यांची ओळख करून ते टाळण्यासाठी सक्रिय उपाययोजना करणे बंधनकारक असेल.हा कायदा २०२२ मध्ये मंजूर झालेल्या युरोपीय संघाच्या ‘डिजिटल सर्व्हिसेस ॲक्ट’ आणि त्यानंतर वर्षभराने ब्रिटनमध्ये लागू झालेल्या ‘ऑनलाइन सेफ्टी ॲक्ट’च्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे.या नवीन कायद्याद्वारे गेम्स, ॲप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट्ससह सर्व ऑनलाइन सेवांसाठी किमान सुरक्षा मानके निश्चित करण्यात आली आहेत.या कायद्यानुसार, ऑस्ट्रेलियन नागरिकांना गंभीर हानी पोहोचवणाऱ्या सामग्रीपासून आणि ऑनलाइन वर्तनापासून सुरक्षित ठेवणे कंपन्यांसाठी अनिवार्य असेल. प्रतिनिधीगृहात मजूर पक्षाच्या सरकारने बहुमताच्या जोरावर हे विधेयक ४३ विरुद्ध ९७ मतांनी मंजूर करून घेतले.
पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी संसदेत बोलताना सांगितले की, हा कायदा आपल्या मुलांना आणि समाजाला ऑनलाइन धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक प्रभावी शस्त्र ठरेल.ते म्हणाले, हा आपल्या मुलांचा आणि तरुणांचा विजय आहे. डिजिटल जगाची सुरुवात झाली, तेव्हा त्यातील धोक्यांचा अंदाज कोणालाही नव्हता. मात्र, आता डिजिटल जग अधिक विकसित झाले असून, या धोक्यांची सहज ओळख पटवून त्यावर उपाययोजना करणे शक्य आहे. सीनेटमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सरकारने मंगळवारी ग्रीन्स पक्षासोबत करार केला. त्यानंतर सीनेटमध्ये हे विधेयक २३ विरुद्ध ३६ मतांनी मंजूर झाले.
ग्रीन्स पक्षाने सुचवलेल्या सुधारणांनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांसाठी कमाल दंडाची मर्यादा सरकारच्या सुरुवातीच्या १०.९ कोटी ऑस्ट्रेलियन डॉलरच्या प्रस्तावावरून वाढवून संबंधित तंत्रज्ञान कंपनीच्या जागतिक उत्पन्नाच्या ५ टक्क्यांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.ग्रीन्स पक्षाच्या प्रमुख वाटाघाटीकार सारा हॅन्सन-यंग यांनी सांगितले की, आज अखेर ऑस्ट्रेलियन नागरिकांची आणि त्यांच्या मुलांची सुरक्षा व कल्याण यांना मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या नफ्यापेक्षा अधिक महत्त्व देण्यात आले आहे. तंत्रज्ञान कंपन्यांना माझा संदेश स्पष्ट आहे. आपली डिजिटल व्यासपीठे सुरक्षित करा, अन्यथा तुम्हाला न्यायालयात खेचले जाईल.
दरम्यान, ऑस्ट्रेलियातील विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांनी या कायद्याला हुकूमशाही स्वरूपाचा ठरवले. तसेच, २०२८ च्या निवडणुकीत त्यांचा कंझर्व्हेटिव्ह लिबरल पक्ष सत्तेत आल्यास हा कायदा रद्द केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड ब्रॅट यांनीही या कायद्यावर तीव्र आक्षेप घेतला. या कायद्यामुळे इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत अमेरिकन कंपन्यांवर नियमांचे पालन करण्याचा असमान बोजा पडेल, असे त्यांनी म्हटले.ब्रॅट यांच्या मते, ऑनलाइन हानीची अस्पष्ट व्याख्या आणि जागतिक उत्पन्नाच्या ५ टक्क्यांपर्यंत दंड आकारण्याच्या तरतुदीमुळे डिजिटल व्यासपीठे कायदेशीरदृष्ट्या वैध असलेली सामग्रीदेखील सेन्सॉर करण्यास भाग पडतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode