
वॉशिंग्टन , 26 नोव्हेंबर (हिं.स.)।रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अनेक मुले आपल्या कुटुंबीयांपासून दुरावली होती. आता यापैकी आणखी नऊ मुलांची त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट घडवून आणण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले आहे. व्हाइट हाऊसने बुधवारी याबाबत माहिती दिली. या नऊ मुलांसह आतापर्यंत कुटुंबीयांशी पुन्हा भेट घडवून आणलेल्या मुलांची संख्या ४३ झाली आहे.
प्रथम महिलेच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाचा हा सातवा टप्पा होता. या टप्प्यात नऊ मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुरक्षितपणे परत पाठवण्यात आले. मेलानिया ट्रम्प यांनी सांगितले की, या कामासाठी रशिया आणि युक्रेनच्या नेत्यांनी सहकार्य केले. दोन्ही देशांनी मुलांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडण्यासाठी मदत केली.त्या म्हणाल्या, प्रत्येक मुलाची आपल्या आई-वडिलांशी पुन्हा भेट घडणे, संपूर्ण मानवजातीला सर्वांसाठी अधिक चांगल्या जगाच्या दिशेने घेऊन जाते. यावेळी त्यांनी प्रौढांना एक आवाहनही केले. युद्धातील मतभेद बाजूला ठेवून मुलांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच, हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याची आपली बांधिलकी त्यांनी व्यक्त केली.
व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांतील मुलांचा समावेश आहे. मात्र, बुधवारी कुटुंबीयांशी पुन्हा भेट घडवून आणलेल्या नऊ मुलांचे राष्ट्रीयत्व स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आलेले नाही.या उपक्रमांतर्गत दोन्ही देशांच्या सरकारांशी सातत्याने संपर्क साधण्यात आला आहे. जुलै महिन्यात व्हाइट हाऊसने या उपक्रमाच्या पाचव्या टप्प्याची माहिती दिली होती. त्यावेळी पाच मुलांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडण्यात आले होते.त्यावेळी मेलानिया ट्रम्प यांनी सांगितले होते की, त्या आणि त्यांचे प्रतिनिधी दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत आणि समुदायांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रक्रियेत मुलांच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय वादांचा परिणाम मुलांवर होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
ऑक्टोबर महिन्यापर्यंत या उपक्रमाचे सहा टप्पे पूर्ण झाले होते. या सहा टप्प्यांमध्ये एकूण ३४ मुलांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडण्यात आले होते. व्हाइट हाऊसच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमादरम्यान दोन्ही देशांमध्ये चर्चेचे मार्ग खुले झाले. पुढे याच संवादाचा उपयोग युक्रेनमधील दक्षिणेकडील ओलेश्की शहरात तात्पुरता युद्धविराम घडवून आणण्यासाठी करण्यात आला.
या कराराची घोषणा २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. २९ ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी होणार होती. शहरात मानवतावादी मदत पोहोचवणे आणि नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देणे, हा या कराराचा मुख्य उद्देश होता.
व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांची पथके सहभागी झाली होती. दोन्ही देशांची पथके समन्वयाने काम करत होती. यामध्ये नागरिकांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था करणे, स्थानिक रहिवाशांना मदत पोहोचवणे आणि भूसुरुंग हटवण्याची तयारी करणे, अशा कामांचा समावेश होता.व्हाइट हाऊसच्या म्हणण्यानुसार, ओलेश्की शहरात प्रामुख्याने वृद्ध नागरिक उरले होते. त्यांना तातडीने मदतीची आवश्यकता होती. या नागरिकांसाठी औषधे, अन्न आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे होते. या मोहिमेनंतर ५ नोव्हेंबर रोजी मेलानिया ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले होते. यावेळी त्यांनी ओलेश्की आणि आसपासच्या परिसरातून सुमारे ८०० नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode