
रत्नागिरी, 26 नोव्हेंबर (हिं.स.) । गेल्या ४५ वर्षांपासून सुरू असलेली दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा यावर्षी गुहागर व रत्नागिरी केंद्रावर रविवार, २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
गुहागरमधील कलाविकास रंगभूमी संस्थेच्या सहकार्याने या स्पर्धेची प्राथमिक फेरी गुहागर येथील श्री व्याडेश्वर देवस्थान हॉलमध्ये रविवारी सकाळी १० वाजता सुरू होईल. रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरी खल्वायन संस्थेच्या सहकार्याने रविवारीच सायंकाळी ४ वाजता ल. वि. केळकर सभागृहाच्या भगवान परशुराम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा मुंबई आणि मुंबईबाहेरील सर्व राज्यांतील विद्यापीठांच्या ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेजच्या तसेच विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन मान्यताप्राप्त कलावंत तसेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणाऱ्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. स्पर्धेत फक्त मराठी किंवा हिन्दी भाषेतील गीत, गझल, भावगीत, भक्तिगीत किंवा अभंग सादर करता येईल. चित्रपट गीतांना व नाट्यसंगीताला परवानगी नाही. प्रत्येक स्पर्धकाला आपले गीत सादर करण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी देण्यात येईल. हार्मोनियम, तबला आणि तानपुरा इतकीच वाद्ये साथसंगतीसाठी वापरता येतील. हार्मोनियम, तबला या वाद्यांची आणि वादकांची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात येईल. स्पर्धक स्वखर्चाने स्वतःच्या पसंतीचे साथीदार आणू शकतात. हार्मोनियम व तबला यांच्या साथीशिवाय स्पर्धेत भाग घेता येणार नाही. गीतांच्या लिखित शब्दांची प्रत किंवा भ्रमणध्वनी समोर ठेवून गाता येणार नाही.
स्पर्धकांनी २८ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करावी. प्रवेश फी १०० रुपये आहे. स्पर्धकाने महाविद्यालयाच्या चालू वर्षाच्या ओळखपत्राची किंवा चालू वर्षाच्या फी पावतीची स्वच्छ झेरॉक्सप्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांत घेण्यात येईल. प्राथमिक स्पर्धेतून निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी मुंबईत दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात सकाळी ९.३० वाजता घेण्यात येईल. अंतिम स्पर्धेसाठी निवडलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहावे. मुंबईबाहेरील स्पर्धकांस जाण्यायेण्याचे द्वितीय वर्गाचे शयनयानाचे रेल्वे भाडे देण्यात येईल. निवासाची व्यवस्था स्पर्धकांस करावी लागेल.
अंतिम स्पर्धेसाठी निवडलेल्या स्पर्धकांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही तीन गीतांची यादी प्राथमिक स्पर्धेनंतर १० दिवसांत सादर करावी लागतील. त्यात बदल करता येणार नाही. त्यापैकी परीक्षकांनी निवडलेले गीत स्पर्धकाला सादरीकरणापूर्वी दहा मिनिटे आधी सांगण्यात येईल. परीक्षकांच्या निवडीत बदल करता येणार नाही.
अंतिम स्पर्धेसाठी अनुक्रमे दहा हजार, सात आणि पाच हजाराची रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रक दिले जाईल. प्राथमिक फेरीत निवड झालेल्या प्रत्येक केंद्रावरील सर्वोत्कृष्ट स्पर्धकास एक हजाराचे पारितोषिक अंतिम फेरीच्या वेळी देण्यात येईल. प्राथमिक फेरीतील सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
गुहागर केंद्रावरील अधिक माहितीसाठी व नावनोंदणी साठी चिन्मय सावरकर (8551997208) व रत्नागिरी केंद्रावरील अधिक माहिती व नावनोंदणीसाठी श्रीनिवास जोशी ( 9404332705 / 9422473080 ) यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थी/ महाविद्यालये यांनी स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी