
मुंबई, २६ नोव्हेंबर (हिं.स.) : अभिनेता आयुष्मान खुराना याच्या मते, प्रेक्षकांना सिनेमात प्रत्येक प्रकारचे नायक आवडतात. मात्र, प्रेम, प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि माणुसकी जपणाऱ्या नायकांची छाप काही वेगळीच असते. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटात आयुष्मान अशाच एका प्रेमळ आणि संवेदनशील ‘प्रेम’ या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेम आणि मानवी नात्यांवर दृढ विश्वास असणाऱ्या या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सूरज बडजात्या यांच्या कथा सांगण्याच्या शैलीत साधेपणा आणि निरागसता असल्याचे आयुष्मानचे मत आहे. त्यांच्या कथा प्रेक्षकांना नात्यांचे महत्त्व आणि माणसांमधील भावनिक बंधांची जाणीव करून देतात. याबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला की, सिनेमात भव्य व्यक्तिमत्त्व असलेल्या नायकांपासून ते स्वतःच्या कमतरता आणि भावनिक गुंतागुंतीशी झुंजणाऱ्या व्यक्तिरेखांपर्यंत प्रत्येक प्रकारच्या नायकाला प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यानेही आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, मनाने विचार करणारा आणि स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देणारा नायक नेहमीच खास ठरतो.
सूरज बडजात्या यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच प्रेम, कुटुंब, माणुसकी आणि एकत्र राहण्याच्या मूल्यांना महत्त्व दिले जाते. आजच्या काळात जगभरात वाढत असलेली कट्टरता आणि संघर्ष पाहता, त्यांचे चित्रपट चांगला माणूस असणे हीदेखील मोठी जमेची बाजू आहे, याची जाणीव करून देतात, असे आयुष्मानने सांगितले.
आपल्या ‘प्रेम’ या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला की, यापूर्वी त्याने साकारलेल्या अनेक पुरुष व्यक्तिरेखा समाजातील वास्तव आणि त्यातील त्रुटी अधोरेखित करणाऱ्या होत्या. मात्र, ‘ये प्रेम मोल लिया’मधील प्रेम ही भूमिका त्याच्यासाठी पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना जगाकडे एका सुंदर नजरेने पाहायला शिकवते. जग जसे आहे तसेच नव्हे, तर ते अधिक सुंदर आणि प्रेमळ कसे असू शकते, याची जाणीव करून देते.
प्रेम, नाती आणि माणुसकीचा सुंदर संदेश देणारा सूरज बडजात्या यांचा ‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट उद्या, २७ नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, आयुष्मानच्या या नव्या भूमिकेला प्रेक्षक किती पसंती देतात, हे पाहणे उत्सुकतेचे
ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर