
सोलापूर, 26 नोव्हेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सोलापूर केंद्रावर शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होत आहे. या स्पर्धेत १७ नाट्यसंस्था आपली नाटके सादर करणार असून, १४ डिसेंबरपर्यंत सोलापूरकरांना दर्जेदार मराठी नाटकांची मेजवानी अनुभवता येणार आहे.
मराठी रंगभूमी समृद्ध करण्यासोबतच नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा स्पर्धेचे ६५ वे वर्ष असून, महाराष्ट्रातील २४ जिल्हास्तरीय केंद्रांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सोलापूर केंद्रावरील स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार आहे. या स्पर्धेत विविध नाट्यसंस्था सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत. त्यामुळे नाट्यरसिकांना वैविध्यपूर्ण विषय आणि वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांचा अनुभव घेता येणार आहे.
नाटकांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
-
२७ नोव्हेंबर – खूनी खंजीर
-
२८ नोव्हेंबर – देव देतो दोन
-
२९ नोव्हेंबर – एक नार गाव बाजार
-
३० नोव्हेंबर – इश्क का परचा
-
१ डिसेंबर – भिंतीवरचा बंगला
-
२ डिसेंबर – पालवी द माइलस्टोन
-
३ डिसेंबर – भोवरा
-
४ डिसेंबर – शेवंता जिती हाय
-
५ डिसेंबर – स्पर्शाची पाल
-
७ डिसेंबर – मत्स्यगंधा
-
८ डिसेंबर – बझर
-
९ डिसेंबर – आय विल कॉल यू लेटर!
-
१० डिसेंबर – अय
-
११ डिसेंबर – अंधायुग
-
१३ डिसेंबर – DNA
-
१४ डिसेंबर – ओॲसिस
-
१५ डिसेंबर – सृजन-मयसभा
सर्व नाट्यप्रयोग सायंकाळी ७ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे होणार आहेत. या स्पर्धेमुळे नवोदित नाट्यकलावंत, लेखक, दिग्दर्शक आणि रंगमंचावरील तंत्रज्ञांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
सोलापूरच्या नाट्यरसिकांनी या स्पर्धेतील प्रयोगांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड