सौदी अरेबियाच्या तेल रिफायनरीवर हुथींचा क्षेपणास्त्र हल्ला
रियाध, 26 नोव्हेंबर (हिं.स.)।येमेनमधील हुथी बंडखोरांनी बुधवारी सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या रास तनुरा तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.नासाच्या उपग्रहाने टिपलेल्या छ
सौदी अरेबियाच्या तेल रिफायनरीवर हुथींचा क्षेपणास्त्र हल्ला


रियाध, 26 नोव्हेंबर (हिं.स.)।येमेनमधील हुथी बंडखोरांनी बुधवारी सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या रास तनुरा तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.नासाच्या उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांमधून रिफायनरीच्या परिसरातील सुमारे ६०० चौरस किलोमीटरच्या आकाशात दाट काळ्या धुराचे लोट पसरल्याचे दिसून आले आहे.हुथींच्या या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, तेलाचे दर प्रति बॅरल ८२ डॉलरच्या पुढे गेले आहेत.

हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील आर्थिक जिल्ह्याला पुन्हा लक्ष्य केल्याचाही दावा केला आहे.दरम्यान, येमेनमधील संघर्ष सौदी अरेबियाच्या पाठिंब्याने सत्तेवर असलेल्या सरकारची राजधानी अदनच्या आणखी जवळ पोहोचला आहे. जमिनीवरील लढाईत सरकारी सैन्याला मागे ढकलत हुथी बंडखोर अदनच्या दिशेने आगेकूच करत आहेत.हुथी बंडखोरांनी ज्या रास तनुरा तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला केला, तो सौदी अरेबियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. या प्रकल्पात उत्पादित होणाऱ्या तेलाचा बहुतांश भाग निर्यात केला जातो. या रिफायनरीची दररोज साडेपाच लाख बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. हुथींच्या लष्करी शाखेचे प्रवक्ते याह्या सारी यांनी सांगितले की, या हल्ल्यात रिफायनरीचे मोठे नुकसान झाले असून तेथे आग लागली आहे.मात्र, सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या प्रवक्त्याने रास तनुरा परिसरातील आकाशात हुथींचे चार हल्लेखोर ड्रोन पाडण्यात आल्याचे सांगितले. मात्र, रिफायनरीवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या आणि या रिफायनरीचे संचालन करणाऱ्या अरामकोनेही या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लाल समुद्रातून होणाऱ्या सौदी अरेबियाच्या तेल निर्यातीवर हुथींनी घातलेली बंदी आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे तेल निर्यातीसमोर निर्माण झालेल्या परिस्थितीवर २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ओपेक प्लसच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

हुथींचे प्रवक्ते याह्या सारी यांनी रियाधमधील आर्थिक जिल्ह्यावर तीन वेळा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले. सौदी अरेबियानेही मंगळवारी या जिल्ह्यावर झालेल्या हल्ल्यात ११ जण जखमी झाल्याची कबुली दिली होती.

जखमींमध्ये दोन भारतीय नागरिकांचाही समावेश होता. या आर्थिक जिल्ह्यातील ८० मजली इमारतीमध्ये अनेक कंपन्यांची मुख्यालये आहेत. बुधवारीही हुथी बंडखोरांनी याच इमारतीला लक्ष्य केले. यापूर्वी १९ नोव्हेंबर रोजीही या इमारतीवर हल्ला करण्यात आला होता

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande