
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.)। प्रीमियम दुचाकी निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या डुकाटी इंडियाने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन डुकाटी डेझर्टएक्स व्ही२ ही साहसी मोटारसायकल दाखल केली आहे. कंपनीने या मोटारसायकलची प्रारंभिक किंमत १९.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद, त्यांच्या सूचना आणि रॅली स्पर्धांमधील अनुभव लक्षात घेऊन या मोटारसायकलची नवीन रचना करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
८९० सीसी क्षमतेचे व्ही२ इंजिन असलेली ही डुकाटीची भारतातील सहावी मोटारसायकल ठरणार आहे. यापूर्वी कंपनीने मॉन्स्टर व्ही२, मल्टिस्ट्राडा व्ही२, पॅनिगेल व्ही२, स्ट्रीटफायटर व्ही२ आणि हायपरमोटार्ड व्ही२ या मोटारसायकली भारतीय बाजारपेठेत दाखल केल्या आहेत.
नवीन डेझर्टएक्स व्ही२ ही दुसऱ्या पिढीतील मोटारसायकल असून, तिच्यामध्ये कंपनीचे नवीन ८९० सीसी, ९० अंश व्ही२ इंजिन देण्यात आले आहे. यासोबत मोनोकोक फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. जुन्या मॉडेलमध्ये ९३७ सीसीचे लिक्विड कूल्ड टेस्टास्ट्रेटा ११ डिग्री इंजिन होते. मात्र, नवीन मॉडेलमध्ये कमी क्षमतेचे असूनही अधिक कार्यक्षम इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ९ हजार आरपीएमवर ११०.३ हॉर्सपॉवर शक्ती आणि ७ हजार आरपीएमवर ९२ एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिनला सहा गिअरच्या गिअरबॉक्सची जोड देण्यात आली आहे. यामुळे रस्त्यांसोबतच खडतर मार्गांवरही उत्तम कामगिरी करण्याची क्षमता या मोटारसायकलमध्ये आहे.
कंपनीने या मोटारसायकलची रॅली आवृत्तीही बाजारात आणली आहे. ऑफरोड प्रवासासाठी आवश्यक असलेल्या विशेष सुविधांनी ती सज्ज आहे. या आवृत्तीमध्ये पुढील चाकाचा सस्पेन्शन प्रवास २३१ मिलिमीटरवरून २४९ मिलिमीटर करण्यात आला आहे. मागील बाजूच्या पूर्णपणे समायोजित करता येणाऱ्या मोनोशॉकमुळे सस्पेन्शनची क्षमता वाढवण्यात आली आहे. उंच सस्पेन्शनमुळे आसनाची उंचीही वाढवण्यात आली असून, कमी उंचीच्या आसनाचा पर्याय उपलब्ध आहे.
वैशिष्ट्यांच्या बाबतीत या मोटारसायकलमध्ये पाच इंचांची टीएफटी स्क्रीन आणि क्रूझ कंट्रोल देण्यात आले आहे. याशिवाय राइडिंग मोड, पॉवर मोड, कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल आणि इंजिन ब्रेक कंट्रोल यांसारख्या आधुनिक सुविधा आहेत. तसेच बायडायरेक्शनल क्विकशिफ्टरमुळे गिअर बदलणे अधिक सोयीचे होणार आहे. प्रीमियम साहसी मोटारसायकलच्या बाजारपेठेत डुकाटीच्या या नव्या मॉडेलमुळे स्पर्धा अधिक रंगण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule