मिनी कूपर एसई इलेक्ट्रिक कार लॉन्च
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.)। प्रीमियम हॅचबॅक कारनिर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी मिनी इंडियाने आपल्या दुसऱ्या पिढीतील मिनी कूपर एसई इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. या कारची प्रारंभिक किंमत ५३.९ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चि
Mini Cooper SE Electric Car Launch


Mini Cooper SE Electric Car Launch


नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर (हिं.स.)। प्रीमियम हॅचबॅक कारनिर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी मिनी इंडियाने आपल्या दुसऱ्या पिढीतील मिनी कूपर एसई इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. या कारची प्रारंभिक किंमत ५३.९ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. या कारच्या वितरणाला डिसेंबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे. भारतात ही कार पूर्णपणे आयात करून एकाच प्रकारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीने या कारच्या नियमित प्रकारासोबतच पॉल स्मिथ विशेष आवृत्तीही सादर केली आहे. दोन दरवाजे असलेल्या या इलेक्ट्रिक कारला भारतीय बाजारपेठेत सध्या थेट प्रतिस्पर्धी नाही.

बॅटरी आणि प्रवास क्षमता

नवीन मिनी कूपर एसईमध्ये ५४.२ किलोवॅट तास क्षमतेचा बॅटरी संच देण्यात आला आहे. ही कार एका पूर्ण चार्जमध्ये ४०२ किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. यात पुढील बाजूस बसवलेली इलेक्ट्रिक मोटार असून ती २१८ अश्वशक्तीची ताकद आणि ३३० एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार अवघ्या ६.७ सेकंदांत ताशी शून्य ते १०० किलोमीटर वेग गाठू शकते, असा कंपनीचा दावा आहे.

या कारमध्ये ११ किलोवॅट क्षमतेचे एसी आणि ९५ किलोवॅट क्षमतेचे डीसी चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. एसी चार्जरच्या मदतीने बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे ५ तास १५ मिनिटे लागतात. तर डीसी जलद चार्जरच्या साहाय्याने अवघ्या ३० मिनिटांत बॅटरी १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते.

आकर्षक रचना आणि आधुनिक सुविधा

नवीन मिनी कूपर एसईमध्ये कंपनीची पारंपरिक रचना कायम ठेवण्यात आली आहे. बंदिस्त पुढील जाळी आणि पुढील भागासह मागील दरवाजावर पिवळ्या रंगातील एस चिन्ह देण्यात आले आहे. कारच्या आतील भागात ९.४ इंचांची गोलाकार ओएलईडी स्पर्शपडदा प्रणाली देण्यात आली आहे. हाच पडदा वाहनाच्या वेगासह विविध माहिती दाखवण्याचे काम करतो. यामध्ये ॲपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, नेव्हिगेशन आणि डिजिटल किल्लीसारख्या सुविधा आहेत.

याशिवाय पॅनोरमिक काचेचे छत, गरम होणारे स्टीअरिंग, विद्युत नियंत्रित पुढील आसने, आसनांची स्मरण सुविधा, हरमन कार्डन ध्वनियंत्रणा, वायरलेस चार्जिंग आणि स्वयंचलित वातानुकूलन यांसारख्या सुविधा मिळतात. सुरक्षेसाठी लेव्हल-२ एडीएएस तंत्रज्ञान, धडक टाळण्याची सूचना, मार्गिका बदलण्याची सूचना, रिव्हर्सिंग सहाय्य, एबीएस, एअरबॅग आणि टायरमधील हवेचा दाब तपासणारी यंत्रणा देण्यात आली आहे. ही कार ब्रिटिश रेसिंग ग्रीन, चिली रेड आणि ओशन वेव्ह ग्रीन या तीन रंगांत उपलब्ध असेल.

दरम्यान, कंपनीने प्रसिद्ध ब्रिटिश फॅशन डिझायनर पॉल स्मिथ यांच्या सहकार्याने विशेष आवृत्तीही सादर केली आहे. कूपर एस, कूपर कन्व्हर्टिबल आणि कूपर एसई या तीन प्रकारांत ही आवृत्ती उपलब्ध असेल. १९९८ पासून सुरू असलेल्या या सहकार्याचे प्रतिबिंब कारच्या बाह्य आणि अंतर्गत रचनेत पाहायला मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande