
हिंदुत्वाच्या विचाराला केंद्रबिंदू मानून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळिरामपंत हेडगेवार यांनी १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून शताब्दी वर्षही संपूर्ण देशात साजरे केले आहे. आता संघ १०१ व्या वर्षाच्या दिशेने आगेकूच करीत आहे.
ही आगेकूच करताना संघाने आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड दिले आहे. अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मान-अपमान पचवून, परकीय तसेच स्वकीयांकडून झालेला उपहास आणि विरोध सहन करीत संघाने यशस्वी वाटचाल केली आहे. या यशस्वी वाटचालीमागे जुन्या काळातील सामान्य कुटुंबांतून आलेल्या, पांढऱ्या वस्त्रांतील आधुनिक ऋषी असलेल्या प्रचारकांची, तसेच गृहस्थी कार्यकर्त्यांची तपश्चर्या आणि सामान्य स्वयंसेवकांची संघकार्यावरील निष्ठा व चिकाटी आहे. त्यामुळेच हिंदूंचे विशाल संघटन असलेला संघ देशव्यापीच नव्हे, तर जगव्यापी होऊन शताब्दी साजरी करू शकला आहे.
आज देशातील एक लाख तीन हजार गावांमध्ये संघाचे कार्य सुरू असून, शताब्दी वर्षात १० कोटी २२ लाख घरांपर्यंत संपर्क साधण्यात आला आहे. दिनांक २९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे शताब्दी वर्षाचा समारोप होत आहे. त्या निमित्ताने हा लेख वाचकांसमोर मांडत आहे.
देशव्यापी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती काय आहे? संघाचे काम कसे चालते? संघकार्याचे दृढीकरण कसे होते आणि नवीन कार्यकर्ता कसा तयार होतो? असे अनेक प्रश्न अनेकांना पडत असतात. त्यावर विचारमंथनही होत असते.
संघकार्याविषयी सर्वसाधारण विचार केला असता, संघाची कार्यपद्धती अत्यंत साधी आणि सोपी असल्याचे दिसून येते. भारतमातेची भक्ती करणारी आणि निरंतर कार्यकर्तानिर्मितीचे केंद्र असलेली एक तासाची संघशाखा हे संघाचे बलस्थान आहे. शाखेवर दररोज एकत्र येऊन स्वदेशी खेळ खेळणे, सामूहिक देशभक्तिपर गीतगायन आणि सहभोजन अशा साध्या व सोप्या कार्यक्रमांमधून हिंदू समाजात आपण एक आहोत, भारतमातेचे पुत्र आहोत आणि भारतमातेसाठी आपल्याला कार्य करायचे आहे, ही समान प्रेरणा व समान धारणा निर्माण केली जाते. हिंदू एकतेच्या विचाराला व्यावहारिक कृतीची जोड शाखेवर दिली जाते. संघशाखेने समाजात निःस्वार्थ समाजसेवेचा भावही निर्माण केला आहे.
अशा साध्या व सोप्या कार्यपद्धतीमुळे संघकार्याचा विस्तार होऊन संघाला शताब्दी साजरी करता आली आहे. संघाच्या कार्यपद्धतीनुसार कोणताही कार्यक्रम केवळ इव्हेंट म्हणून साजरा करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संघाच्या शताब्दी वर्षात स्वयंसेवकांनी गावोगावी डॉ. हेडगेवार आणि श्री. गोळवलकर गुरुजी यांचे पुतळे उभे न करता संघाच्या शाखा सुरू केल्या. दुर्गम भागांतील पाडे, तांडे आणि छोट्या वस्त्यांमध्ये सेवा प्रकल्प उभे करून संघकार्याचा प्रचंड विस्तार केला.
यापूर्वी डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीमध्ये सेवाकार्य अभियान, श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दीमध्ये राष्ट्रजागरण अभियान आणि आता पंचपरिवर्तन यांसारख्या गुणवत्तापूर्ण सामाजिक उपक्रमांची रचना करण्यात आली होती.
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचे जन्मशताब्दी वर्ष १९८८-१९८९ मध्ये संपूर्ण देशात साजरे करण्यात आले. जन्मशताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाकार्यांना मोठी चालना देण्यात आली. देशातील दुर्गम भागांत आणि सेवा वस्त्यांमध्ये सेवा प्रकल्प सुरू करून समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण व आरोग्यसेवा पोहोचविण्यावर भर देण्यात आला.
देशभरात जवळपास ७६ हजार कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सुमारे १५ कोटी लोकांशी संपर्क साधून त्यांना संघकार्याची माहिती देण्यात आली. डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने देशभरात सेवा प्रकल्प आणि सेवाकार्याचे जाळे विणले गेले. संघाच्या विविध आयामांमध्ये सेवाकार्याचा विभाग प्रभावी करून संघाचे अखिल भारतीय अधिकारी के. सूर्यनारायण राव यांच्याकडे देशभरातील सेवाकार्याची जबाबदारी देण्यात आली होती.
डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने देशात सेवाकार्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानद्वारे चालविण्यात येणारा डॉ. हेडगेवार रुग्णालय हा वैद्यकीय सेवा प्रकल्प याच काळात उभा राहिला. डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षात देशाच्या विविध भागांत समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले; मात्र त्यांचे पुतळे उभारण्यात आले नाहीत.
श्री. गोळवलकर गुरुजी जन्मशताब्दी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांची जन्मशताब्दी २००६-२००७ या काळात राष्ट्रजागरण अभियान म्हणून साजरी करण्यात आली.
जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ विजय एकादशीला, दिनांक २४ फेब्रुवारी २००६ रोजी नागपूर येथील रेशीमबाग येथे तत्कालीन सरसंघचालक के. एस. सुदर्शन आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत झाला होता. तर दिनांक १८ फेब्रुवारी २००७ रोजी दिल्ली येथे उपराष्ट्रपती भैरोंसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम झाला.
श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दीमध्ये संघकार्याच्या विस्तारासाठी देशातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विशाल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक समरसतेच्या विषयावर विशेष भर देण्यात आला. त्यानंतरच्या काळात संघाच्या कार्यविभागांमध्ये समरसता कार्यविभाग सुरू करण्यात आला.
संघाचे कार्य सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी करण्यासाठी संघशाखांवर आधारित कार्यक्रमांची रचनाही करण्यात आली होती. सरसंघचालक सुदर्शनजी यांचे पत्र स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन दिले होते.
श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दी काळात संघाच्या वतीने देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये प्रबुद्ध नागरिकांसोबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक राष्ट्रवाद, सामाजिक समरसता, राष्ट्रीय सुरक्षा व दहशतवाद, भारतीय संस्कृतीचे संरक्षण, स्वदेशी आणि आर्थिक स्वावलंबन, सेंद्रिय शेती व गोआधारित अर्थव्यवस्था, लोकसंख्येतील असमतोल अशा विषयांवर देशभर चर्चासत्रे झाली होती.
मात्र, श्री. गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षात पुतळे उभारण्याऐवजी सामाजिक समरसतेच्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले.
गावोगावी पुतळे नव्हे, संघकार्याचा विस्तार!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्ष साजरे करताना मोठ्या कार्यक्रमांची रचना केली नाही. तसेच गावोगावी संघसंस्थापक डॉ. केशव बळिरामपंत हेडगेवार, श्री. गोळवलकर गुरुजी किंवा बाळासाहेब देवरस यांचे पुतळे उभारले नाहीत. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ट्रस्ट किंवा स्मारकेही उभारली नाहीत. 'डॉ. हेडगेवार अमर रहे', 'सरसंघचालकजी आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं' अशा घोषणाही दिल्या नाहीत.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसेतू हिमाचलपर्यंतच्या संघकार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमध्ये संघाला अपेक्षित असलेला हिंदू समाज एकतेच्या सूत्रात बांधण्याचे काम केले. अर्थात, संघकार्य उभे केले. संघकार्याचा विस्तार करून गावोगावी संघाच्या शाखा, साप्ताहिक मिलन आणि संघमंडळे उभी केली.
पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून संघशाखांवर भारतमातेची भक्ती करणारा, जात-पात आणि भेदभावांच्या पलीकडे जाऊन समरस व एकात्म हिंदू समाज भगव्या ध्वजाखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. जॉइंट आर.एस.एस.च्या माध्यमातून भारतमातेची आराधना करणारे लाखो तरुण स्वयंसेवक घडविले, ज्यांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत जाऊन निःस्वार्थपणे काम करण्याची प्रेरणा घेतली.
त्यामुळेच आज संघाच्या शताब्दी वर्षाचा समारोप होत असताना संघकार्याचा प्रचंड विस्तार झाला असून, जवळपास एक लाख तीन हजार गावांमध्ये संघाचे कार्य सुरू आहे. संघाच्या विविध क्षेत्रांतील कामाचाही मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे.
व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण हे उच्च ध्येय घेऊन संघ आणि संघाचे कार्यकर्ते गेल्या १०० वर्षांपासून राष्ट्रउभारणीच्या कार्यात कार्यरत आहेत. संघाची शाखा, संघाचे विविध आयाम आणि समाजोपयोगी प्रकल्पांमुळे संघाचे काम आता सर्वस्पर्शी व सर्वव्यापी होताना दिसत आहे.
आरोग्यविषयक प्रकल्प, स्वदेशीचा आग्रह, ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन, पाणीप्रश्न, गोरक्षण तथा गोसंवर्धन आणि सामाजिक समरसता अशा विविध आयामांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत असून, त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत.
सामाजिक समरसतेच्या विचारातून 'एक गाव, एक पाणवठा' यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. दलित समाजातील तरुणांना पौरोहित्याचे प्रशिक्षण देऊन मंदिरांमध्ये पूजापाठ करण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. दुर्गम भागांतील वनवासी बांधवांसाठी शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सेवाप्रकल्प उभे करण्यात आले. त्यामुळे धर्मांतराला आळा बसल्याचा संघाचा दावा आहे. मीनाक्षीपुरमसारख्या घटनांची देशात पुनरावृत्ती झालेली नाही, असेही या कार्याच्या संदर्भात नमूद करता येईल.
संघाच्या शताब्दी वर्षात उपरोक्त विविध आयाम आणि चळवळींचा देशभर विस्तार करून समाजपरिवर्तन आणि राष्ट्रजागरणाच्या कार्यात संघाने आगेकूच केली आहे.
— अशोक राणे अकोला मो. ९४२३६५८३८
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी