‘अजिनी’ नौकेवरील २० इराणी खलाशांची सुटका; भारताच्या शौर्याचे इराणकडून कौतुक
नवी दिल्ली , 03 नोव्हेंबर (हिं.स.)।समुद्री चाच्यांच्या तावडीतून मासेमारी नौका ‘अजिनी’वरील २० इराणी खलाशांची सुखरूप सुटका केल्याबद्दल इराणच्या दूतावासाने भारत सरकार, भारतीय नौदल आणि हवाई दलाचे आभार मानले आहेत. भारतीय सशस्त्र दलांचे धाडस, व्यावसायिक
‘अजिनी’ नौकेवरील २० इराणी खलाशांची सुटका; भारताच्या शौर्याचे इराणकडून कौतुक


नवी दिल्ली , 03 नोव्हेंबर (हिं.स.)।समुद्री चाच्यांच्या तावडीतून मासेमारी नौका ‘अजिनी’वरील २० इराणी खलाशांची सुखरूप सुटका केल्याबद्दल इराणच्या दूतावासाने भारत सरकार, भारतीय नौदल आणि हवाई दलाचे आभार मानले आहेत. भारतीय सशस्त्र दलांचे धाडस, व्यावसायिक कौशल्य आणि उत्कृष्ट समन्वयाचे कौतुक करताना, ही मोहीम भारत आणि इराण यांच्यातील मैत्री व सहकार्याचे प्रतीक असल्याचे दूतावासाने म्हटले आहे.

भारतातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दूतावासाने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, नवी दिल्लीतील इराणचे दूतावास भारत सरकार, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. समुद्री चाच्यांच्या तावडीतून मासेमारी नौका ‘अजिनी’वरील २० इराणी खलाशांची सुटका करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी यशस्वी मोहीम राबवली.

दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, भारतीय सशस्त्र दलांचा व्यावसायिक दृष्टिकोन, धाडस आणि उत्कृष्ट समन्वय कौतुकास्पद आहे. या मोहिमेतून मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणासाठी (एचएडीआर) भारताची ठाम बांधिलकी दिसून येते. तसेच, देशाच्या सीमांपलीकडे जाऊन नागरिकांचे प्राण वाचवण्यात भारत किती महत्त्वाची भूमिका बजावतो, हेही या मोहिमेने अधोरेखित केले आहे. ही मानवतावादी मोहीम भारत आणि इराण यांच्यातील मैत्री, एकजूट आणि सहकार्याच्या भावनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

अरबी समुद्रात सुमारे ४८ तास चाललेली ही मोहीम सोमवारी पूर्ण झाली. या मोहिमेबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलाच्या धाडसाचे भरभरून कौतुक केले. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, भारतीय हवाई दलाकडून वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे चाच्यांचे अचूक ठिकाण शोधण्यात आले. त्यानंतर अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या समुद्री चाच्यांच्या तावडीतून जहाजासह सर्व खलाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली. भारतीय नौदलाची उच्चस्तरीय कार्यतत्परता आणि संपूर्ण क्षेत्रातील सागरी धोक्यांचा निर्णायकपणे सामना करण्याची क्षमता या मोहिमेतून दिसून आली.

राजनाथ सिंह यांनी पुढे म्हटले की, आपल्या शूर जवानांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, नागरिकांचे प्राण वाचवणे, सागरी सुरक्षा कायम राखणे आणि संपूर्ण हिंद महासागर क्षेत्रात स्थैर्य सुनिश्चित करणे यासाठी भारताकडे आवश्यक क्षमता, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande