
नाशिक, 03 नोव्हेंबर, (हिं.स.) : कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांसाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कांदा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'बीसीएन' आणि 'बीसीएनए' मालवाहू वॅगनची अनुमत वहन क्षमता ४५ टन निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ही क्षमता सुमारे ६० ते ६४ टनांपर्यंत होती. क्षमतेत कपात झाल्याने रेल्वेच्या वाहतूक भाड्यात थेट २९ टक्क्यांपर्यंत घट होणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या या सुधारित सूचना २८ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाल्या असून २७ ऑक्टोबर २०२७ पर्यंत वर्षभरासाठी अमलात राहतील. मंत्रालयाने याविषयी 'अपेडा'ला अधिकृत पत्राद्वारे कळवले आहे. लासलगाव, पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठांमधून देशभरात आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर कांदा पाठवला जातो. नाशवंत कांद्यासाठी रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेचा पर्याय किफायतशीर ठरणार असल्याने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची स्पर्धात्मकता वाढेल. दरम्यान, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. वाहतूक खर्चात होणाऱ्या या बचतीचा प्रत्यक्ष लाभ केवळ व्यापारी किंवा निर्यातदारांपुरता मर्यादित न राहता कांदा खरेदी दराच्या माध्यमातून तो थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जावा, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
निर्णयाचे स्वागत
“कांदा रेल्वे वाहतूक भाड्यात सुमारे २९ टक्के कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे कांदा व्यापार आणि निर्यातीला चालना मिळण्यास मदत होईल. मात्र या निर्णयाचा खरा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक बाजारपेठांना रेल्वे वाहतुकीशी जोडून विशेष कांदा मालवाहतूक सुविधा सुरू कराव्यात. कांद्याच्या वाहतुकीचा खर्च कमी होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या कांद्याला कायमस्वरूपी रास्त भाव मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.”
– भारत दिघोळे
संस्थापक अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI