“भारताची प्रगती रोखता येत नसल्याने; सामाजिक संघर्ष घडविण्याचे प्रयत्न”- सुधांशू त्रिवेदी
उत्तर-दक्षिण, भाषिक, जातीय आणि महिला-पुरुष असा संघर्ष पेटविण्याचे षड्यंत्र एसआयआरला विरोध करण्यामागे विशिष्ट मतपेढी वाचविण्याचा हेतू नागपूर, 03 नोव्हेंबर (हिं.स.) : भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा, आर्थिक प्रगती आणि सामरिक ताकद रोखण्यात अपयश आल
सुधांशू त्रिवेदी, भाजप खासदार व राष्ट्रीय प्रवक्ता


उत्तर-दक्षिण, भाषिक, जातीय आणि महिला-पुरुष असा संघर्ष पेटविण्याचे षड्यंत्र

एसआयआरला विरोध करण्यामागे विशिष्ट मतपेढी वाचविण्याचा हेतू

नागपूर, 03 नोव्हेंबर (हिं.स.) : भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा, आर्थिक प्रगती आणि सामरिक ताकद रोखण्यात अपयश आल्यानंतर आता देशांतर्गत सामाजिक संघर्ष आणि अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर-दक्षिण, भाषिक, जातीय तसेच महिला-पुरुष असा संघर्ष निर्माण करून समाजात फूट पाडण्याची रणनीती आखली जात असल्याचा आरोप भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केला. केवळ संवैधानिक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे नव्हे, तर समाजालाच अस्थिर करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

‘लोकतंत्र बचाओ – अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत नागपुरात आयोजित ‘राष्ट्रचिंतन संवाद’ कार्यक्रमात डॉ. त्रिवेदी म्हणाले की, भारताला बाह्य शक्तींच्या माध्यमातून रोखणे शक्य नसल्याने देशांतर्गत संघर्ष निर्माण करून विकासाची गती खुंटविण्याचे प्रयत्न होत असल्याचे त्रिवेदी म्हणाले. भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा आणि सामरिक सामर्थ्य काही भारतविरोधी शक्तींना खटकत असून, हिंदू धर्माचा समूळ नाश करणे हेही अशा शक्तींचे मोठे उद्दिष्ट असल्याचा दावा त्यांनी केला.

मतदारयादीच्या शुद्धीकरणावरून विरोधकांना लक्ष्य

मतदारयादीच्या शुद्धीकरण प्रक्रियेला विरोध करण्यामागे विशिष्ट मतपेढी वाचविण्याचा हेतू असल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला. सीमावर्ती भागांत घुसखोरांना मतदार बनवून त्यांच्या मतांच्या जोरावर सत्ता मिळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. बनावट कागदपत्रे तयार करता येतील; मात्र २० वर्षांपूर्वीचे बनावट आई-वडील कुठून आणणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.ईव्हीएममध्ये सेटिंग असल्याचा आरोप केल्यानंतर आता मतदारयादी व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ईव्हीएमच मॅनेज असेल, तर मतदारयादी मॅनेज करण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला.मतदारयादीतून 13 कोटी नावे वगळण्यात आल्याचा आरोप चुकीचा असल्याचे सांगताना त्यांनी संबंधित आकडेवारी मांडली. त्यांच्या दाव्यानुसार, 2.80 कोटी मतदारांचा मृत्यू झाला आहे, 6 कोटी मतदार स्थलांतरित झाले आहेत, एक कोटी दुबार मतदार आहेत, तर 3 कोटी मतदार नोंदणीकृत पत्त्यावर आढळलेले नाहीत. या 3 कोटी मतदारांच्या मुद्द्यावरच काँग्रेसचे राजकारण अवलंबून असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणावरही टीका

त्रिवेदी यांनी काँग्रेसच्या तत्कालीन सरकारच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणावरही निशाणा साधला. केजीबी आणि सीआयएच्या अवर्गीकृत दस्तऐवजांमध्ये काँग्रेसला सद्दाम हुसेन यांच्याकडून पैसे मिळत असल्याचा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. नटवर सिंग यांचे मंत्रिपद जाण्यामागेही हाच मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.जगातील अनेक देश सध्या अंतर्गत संघर्ष आणि आर्थिक आव्हानांचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे भारताची प्रगती आणि एकात्मता टिकविणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला आमदार संजय भेंडे, आमदार परिणय फुके, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, अनिल सोले, गिरीश व्यास, जयप्रकाश गुप्ता, संदीप सुराणा, अविनाश ठाकरे, गिरीश मुंदडा, श्यामसुंदर सोनी, नितीन खारा, आशीष काळे आणि ऍड. नितीन तेलगोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande