
नाशिक, 03 नोव्हेंबर, (हिं.स.)। अंगावर वाहतूक पोलिसांचा गणवेश, हातात चलन आकारण्याचे मशीन आणि वाहनचालकांकडून पैशांची मागणी... असा बनाव करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया वाहतूक पोलिसाचा प्रकार पिंपळगाव बसवंत येथे उघडकीस आला. याप्रकरणी आकाश बाळासाहेब क्षीरसागर (रा. ओझर) याच्याविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचखेड चौफुली येथील सर्व्हिस रोडवर हा प्रकार घडला. आकाश क्षीरसागर याने कोणताही शासकीय अधिकार नसताना वाहतूक पोलीस असल्याचे भासवून वाहनचालकांकडे पैशांची मागणी केली. त्याने अंगावर ‘महाराष्ट्र पोलीस’ असा बॅज, वाहतूक पोलिसांचा लोगो असलेला गणवेश, खाकी रंगाची पँट आणि काळा बेल्ट परिधान केला होता. तसेच हातात पांढऱ्या रंगाचे मशीन घेऊन वाहनचालकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. या वेशभूषेच्या आधारे वाहनचालकांकडून बळजबरीने पैसे उकळण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI