

रायगड, 03 नोव्हेंबर (हिं.स.)। पनवेल तालुक्यातील दांडफाटा येथील हिरानंदानी फॉर्च्युन सिटी गृहप्रकल्पातील मिलोना इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून पडून आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसी मच्छिंद्र पोपटे (३२), मुलगा रुद्र (११) आणि मुलगी अंशिका (६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोपटे कुटुंब मूळचे खालापूर तालुक्यातील आश्रय गावचे आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मच्छिंद्र पोपटे यांनी रिअल इस्टेट एजंट विश्वनाथ देसाई यांच्याकडून व्यावसायिक कारणासाठी सुमारे दोन लाख रुपये घेतले होते. या पैशांच्या वसुलीसाठी विश्वनाथ देसाई आणि त्यांची पत्नी अक्षरा देसाई यांच्याकडून वारंवार तगादा लावला जात होता.
घटनेच्या रात्री मच्छिंद्र पोपटे घरी नसताना देसाई दाम्पत्य त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर फोनवरून पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला. यावेळी पत्नी आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या मानसिक तणावातून मानसी यांनी मुलांसह इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेतल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मात्र, या घटनेबाबत पोपटे कुटुंबीय आणि काही स्थानिकांनी संशय व्यक्त केला असून, हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्याकांड असण्याची शक्यताही तपासण्याची मागणी केली आहे.दरम्यान, पोलिसांनी विश्वनाथ देसाई आणि अक्षरा देसाई यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत. आमदार महेश बालदी यांनी रुग्णालयात भेट देऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)