
रायगड, ०३ नोव्हेंबर (हिं.स.) : खालापूर तालुक्यातील कलोते येथील सॅनी हेवी इंडस्ट्री इंडिया प्रा. लि. कंपनीच्या यार्डमधून इलेक्ट्रिक ट्रकचे पाच स्टेपनी टायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीला गेलेल्या या टायरची एकूण किंमत १ लाख २९ हजार २५५ रुपये आहे. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कलोते येथील सॅनी हेवी इंडस्ट्री इंडिया प्रा. लि. कंपनीच्या खालापूर यार्डमधील बी झोन परिसरात ही चोरी झाली. फिर्यादी काम करीत असलेल्या या ठिकाणाहून अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी इलेक्ट्रिक ट्रकचे पाच स्टेपनी टायर चोरून नेले.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर कंपनीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. चोरीला गेलेल्या टायरची किंमत १ लाख २९ हजार २५५ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या चोरीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हाके करीत आहेत. चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)