
वाढते दर आणि आयात शुल्काचा परिणाम; सोन्याची मागणी नीचांकी पातळीवर जाण्याचा अंदाज
नवी दिल्ली, ०३ नोव्हेंबर (हिं.स.) : सोन्याच्या आकर्षणाच्या बाबतीत भारताला नेहमीच जगातील आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळाले आहे. विशेषतः सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीत भारताचा जगातील पहिल्या तीन देशांमध्ये समावेश होतो. मात्र, सोन्याचे गगनाला भिडलेले दर आणि त्यावर आकारण्यात येणारे भरमसाट कर यामुळे भारतीय ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील सोन्याच्या मागणीवर झाला असून, त्यात वार्षिक आधारावर तब्बल २९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत भारतातील सोन्याची एकूण मागणी घसरून १६२.५ टनांवर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी २२९.८ टन होती. विशेष म्हणजे, वजनाच्या आधारावर मागणीत मोठी घट झाली असली, तरी सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे मूल्याच्या आधारावर खरेदीत तीन टक्क्यांची वाढ होऊन ती २.४१ लाख कोटी रुपयांच्या पुढे पोहोचली आहे.सोन्याच्या मागणीतील या घसरणीमागे मौल्यवान धातूचे वाढलेले दर, आयात शुल्काचा भार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत गरज असेल तेव्हाच सोने खरेदी करण्याचे केलेले आवाहन ही प्रमुख कारणे मानली जात आहेत.
दागिन्यांच्या मागणीतही मोठी घट
भारतीय बाजारपेठेत पारंपरिकदृष्ट्या सर्वाधिक मागणी असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीतही मोठी घट झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत दागिन्यांची मागणी वार्षिक आधारावर २० टक्क्यांनी घसरून ९९.९ टनांवर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी १२५ टन होती.वर्ल्ड गोल्ड कौन्सिल इंडियाच्या मते, सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहक आता वजनदार दागिन्यांऐवजी कमी वजनाचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच नवीन दागिने खरेदी करण्याऐवजी जुने दागिने बदलून नवीन दागिने घेण्याचा पर्यायही ग्राहकांकडून निवडला जात आहे.
नाणी आणि सोन्याच्या लगडींच्या खरेदीत ४० टक्क्यांची घसरण
गुंतवणुकीच्या उद्देशाने खरेदी केल्या जाणाऱ्या सोन्याच्या नाण्यांची आणि लगडींची मागणीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. या श्रेणीतील मागणीत तब्बल ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत ९१.६ टन सोन्याची नाणी आणि लगडी विकल्या गेल्या होत्या. यंदा त्यांची विक्री केवळ ५५ टनांवर आली आहे.सोन्याच्या खरेदीतील मंदीचा परिणाम देशाच्या निव्वळ सोन्याच्या आयातीवरही झाला आहे. या कालावधीत सोन्याच्या आयातीत सुमारे ४६ टक्क्यांची घट होऊन आयात ११४.१ टनांवर आली आहे. विशेष म्हणजे, भारतीय रिझर्व्ह बँकेनेही या कालावधीत सोन्याची कोणतीही नवीन खरेदी केलेली नाही.
सहा वर्षांतील नीचांकी पातळी गाठण्याची शक्यता
सोन्याच्या बाजारातील सध्याची मंदी लक्षात घेता, संपूर्ण २०२६ वर्षात भारताची एकूण सोन्याची मागणी गेल्या सहा वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने व्यक्त केली आहे. वर्षभरातील एकूण मागणी ६२५ ते ६७५ टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.भारताच्या सोन्याच्या एकूण मागणीपैकी निम्म्याहून अधिक मागणी ग्रामीण भागातून येते. मात्र, सध्या ग्रामीण भागातील उत्पन्नावर दबाव असल्याने सोन्याच्या बाजारपेठेत तातडीने सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
लग्नसराई आणि सणासुदीमुळे मागणी वाढण्याची आशा
दरम्यान, आगामी लग्नसराई आणि दिवाळी, धनत्रयोदशी यांसारख्या महत्त्वाच्या सणांमुळे वर्षाच्या अखेरच्या महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत काही प्रमाणात वाढ होण्याची आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.दुसरीकडे, जागतिक बाजारपेठेत मात्र सोन्याची मागणी मजबूत राहिली आहे. विविध देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत असून, पोलंड आणि चीनसारखे देश आपल्या सोन्याच्या साठ्यात सातत्याने वाढ करत आहेत. त्यामुळे भारतातील ग्राहकांच्या खरेदीतील मंदी आणि जागतिक स्तरावरील मजबूत मागणी असे परस्परविरोधी चित्र सध्या सोन्याच्या बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule