
ढाका, 03 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये सोमवारी वस्त्रोद्योग कारखाने पुन्हा सुरू झाले. मात्र, राजधानी ढाका आणि आसपासच्या औद्योगिक परिसरात पोलीस व कामगारांमध्ये पुन्हा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले.रविवारी मोठ्या प्रमाणावर कारखाने बंद राहिल्यानंतर सोमवारी पुन्हा उसळलेल्या हिंसाचारामुळे उत्पादकांची चिंता वाढली आहे. कामगारांना सध्या मिळणाऱ्या १२ हजार ५०० टका मासिक किमान वेतनाऐवजी ३० हजार टका वेतन देण्याची मागणी केली जात आहे.
सोमवारी राजधानी ढाका आणि प्रमुख औद्योगिक भागांमध्ये पुन्हा अशांतता पसरली. राजधानीत आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर रस्ते अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगारांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.कामगारांच्या वेतनवाढीच्या मागणीवर विचार करण्यासाठी सरकारने रविवारी सहा सदस्यीय किमान वेतन मंडळाची स्थापना केली होती.
दरम्यान, बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. डिसेंबरपूर्वी देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. वस्त्रोद्योग क्षेत्रातील सध्याच्या अशांततेचा संबंधही त्यांनी या प्रयत्नांशी जोडला. तसेच, या परिस्थितीचा संबंध माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशीही असल्याचे रहमान यांनी सूचित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode